अनैतिक संबंधाच्या संशयावरून इंदोरीत तरुणाचा खून

0
114
murder english
File Photo

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – चाकूने वार, पाठीत मोठा दगड मारून एका तरुणाचा खून केल्याची घटना मावळ तालुक्यातील इंदोरी येथे घडली. पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशयातून पती, सासरा आणि दिराने मिळून हे कृत्य केल्याचे सांगितले जात आहे. ही घटना बुधवारी (दि. 9) रात्री साडेनऊ वाजता घडली.

भागूजी बाळू केदारी (28, रा. ठाकरवस्ती, इंदोरी, ता. मावळ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी भागूजी यांच्या पत्नी सुरेखा भागूजी केदारी (25) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी लक्ष्मण उर्फ खन्ना दादू केदारी (25), दादू भिवा केदारी (45), अरुण दादू केदारी (22, सर्व रा. ठाकरवस्ती, इंदोरी, ता. मावळ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी लक्ष्मण आणि दादू यांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी लक्ष्मण याच्या पत्नीसोबत मृत भागूजी आणि त्याचा मित्र सुनील केवाळे या दोघांचे अनैतिक संबंध असल्याचा संशय आरोपी लक्ष्मण याला होता. त्याच संशयावरून आरोपींनी आपसात संगनमत करून बुधवारी रात्री साडेनऊ वाजता इंदोरी गावच्या हद्दीत इंदोरी-जांभवडे रोडवर बबन केदारी यांच्या घरासमोर भागूजी यांना गाठले.
आरोपींनी भागूजी यांच्या पोटावर चाकूने वार केले. डोक्यावर लाकडी दांडक्याने मारहाण केली. त्यानंतर मोठा दगड पाठीवर घालून भागूजी यांचा खून केला.

घटनेची माहिती मिळताच तळेगाव एमआयडीसी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आरोपी लक्ष्मण आणि त्याचे वडील दादू या दोघांना ताब्यात घेतले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप लोंढे तपास करीत आहेत.