सोलापूर : अनैतिक संबंधास अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीच्या प्रियकराने काढला ‘काटा’, केलं ‘खल्लास’

सोलापूर :  पोलिसनामा ऑनलाईन – अनैतिक संबंधास अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीच्या प्रियकराने काढला काटा काढल्याची घटना सोलापूर जिल्ह्यातील दहिटणे येथे घडली.  याप्रकरणी जोडभावी पोलिसांनी अवघ्या १२ तासांत खुनाचा छडा लावत प्रियकराला बेड्या ठोकल्या आहेत. सलिम राजअहमद ऊर्फ देवा शेख (वय ३४, रा. राही मंगल कार्यालया मागे, शेळगी) असे खून झालेल्याचेनाव आहे  तर  नबीलाल रजाक शेख (रा. मित्रनगर, शेळगी) असे अटक केलेल्या प्रियकराचे नाव आहे. याबाबतची फिर्याद  नसिमा राजअहमद उर्फ देवा शेख ( रा. राही मंगल कार्यालयामागे, शेळगी) यांनी  दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की,  सलीम हा मार्केट यार्डात  डाळिंब पॅकिंगच्या मजुरीचे काम करीत असे. या कामामध्ये त्याची पत्नीही  त्याला मदत करत असे.  सलीम हा आई नसिमा, पत्नी, मुलांसोबत शेळगी येथे राहात होता. दरम्यान, याच भागात राहणाऱ्या नबिलाल शेख याच्याशी सलीमच्या पत्नीशी संबंध होते. याची  दोन महिन्यापूर्वी सलीम व त्याची आई नसिमा यांना माहिती मिळाली. तेव्हा नसिमा हिने सुनेला अनैतिक संबंधाबद्दल जाब विचाराला तसेच वागणूक सुधारण्याबद्दल समजावून सांगितले होते.

सलीम व त्याची पत्नी नेहमीप्रमाणे  मंगळवारी सकाळी सहाच्या सुमारास हमालीकरिता मोटारसायकलवरून मार्केट यार्डात निघून गेले. तेथून काम आटोपून ते दोघे दुपारी तीन वाजता घरी आले. दरम्यान दुपारी ४ वाजता नबीलाल शेख हा सलीमच्या घरी आला. त्याने सलीम शेख याला काही कामानिमित्ताने मोटारसायकलवरून बसवून नेले. त्यानंतर रात्री ८.३०  वाजण्याच्या सुमारास सलीमच्या शेजारी राहणारा शाहरूखने नसिमा यांना सलीमला मारले असून तो जखमी अवस्थेत  पडल्याचे सांगितले. हे समजताच नसिमा यांनी सून, भावाची मुलगी आदींसह सर्वजण रिक्षाने घटनास्थळी दहिटणे येथे आले.  दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या  सलीमला  उपचारासाठी सिव्हिलमध्ये हलविले, परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत चौकशीत नसिमा यांनी सलीमला नबीलाल याने मोटारसायकलवरून रात्री नेल्याचे सांगितले. नबीलाल आणि सलीमच्या पत्नीत अनैतिक संबंध असल्याचेही नसिमा यांनी फिर्यादीत स्पष्ट केले. सलीम त्याला अडथळा ठरत असल्यानेच नबीलाल यानेच खून केल्याची तक्रार केली. या फिर्यादीवरून पोलिसांनी नबीलाल शेख  याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत नबीलालनेच सलीम हा अनैतिक संबंधाच्या आड येत असल्याचे चौकशीत समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. नबिलालने सलीमला मोटारसायकलवरून नेले. अचानक बोलण्यात गुंग असताना धारधार शस्त्राने सलीमच्या डोक्यात वार केले. त्यात तो खाली कोसळला. अतिरक्तस्रावाने त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले.  अधिक तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र करणकोट करीत आहेत.