परभणी जिल्ह्यातील मानवतमध्ये महिलेचा खून झाल्यानं प्रचंड खळबळ

मानवत : पोलीसनामा ऑनलाइन – एका महिलेचा खून झाल्याची घटना मानवत (जि. परभणी) शहरातील फुलेनगरमध्ये घडली आहे. रविवारी (दि. 21) रात्री आठच्या सुमारास घडलेल्या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मानवत पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

तबस्सूम बडेसाब शेख (वय, 43) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. मानवत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फुलेनगर येथे तबस्सूम शेख या गेल्या काही वर्षांपासून देह विक्रीचा व्यवसाय करत होत्या. रविवारी रात्री 8 च्या सुमारास शेजारी राहणा-या एका महिलेला तबस्सुम या बेशुध्दावस्थेत व संशयास्पद स्थितीत आढळल्या. त्यांनी लगेच हा प्रकार मानवत पोलिसांना कळवला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यात तबस्सूम यांचा तोंडावर उशी किंवा शाल दाबून खून झाल्याची बाब निदर्शनास आली. तसेच घरातील सामान ही अस्ताव्यस्त असल्याचे दिसून आले. तपास पोलिस निरीक्षक रमेश स्वामी करत आहेत.