एकतर्फी प्रेमप्रकरणातून महिलेचा भर रस्त्यात खून, पिंपरी चिंचवडमधील खळबळजनक घटना

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी-चिंचवडमध्ये एकतर्फी प्रेमप्रकरणातून एका विवाहित तरुणाने एका विवाहित महिलेचा भर रस्त्यात चाकूने सपासप वार करून खून केल्याची धक्कादायक घटना चिखलीमध्ये घडली आहे. महिलेवर हल्ला केल्यानंतर आरोपीने स्वत:वर वार करून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना आज (शनिवार) दुपारी दोनच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

राणी सतीश लांडगे (वय-29) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर अरविंद शेषेराव गाडे (वय-30) असे जखमी आरोपीचे नाव आहे. हे दोघेही विवाहित असून एकमेकांच्या शेजारी राहतात. मृत महिलेला तीन मुलं तर जखमी आरोपीला दोन मुलं असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी सतीश लांडगे यांनी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

चिखली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरविंद याचे राणी लांडगे यांच्यावर एकतर्फी प्रेम होते. तो त्यांच्यासोबत वारंवार बोलण्याचा प्रयत्न करत होता. याबाबत राणी यांच्या पतीला समजल्यावर त्यांनी त्याला समजावून सांगितले होते. आरोपी अरविंद मोबाइलवरून देखील सतत त्रास देत होता. या त्रासाला कंटाळून मयत राणी यांनी आपला फोननंबर बदलला. त्यामुळे अरविंद चिडला होता.

आज दुपारी राणी या कामावरून घरी जात असताना आरोपीने त्यांना भर रस्त्यात आडवले. त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. यावरून दोघांमध्ये वाद झाले. रागाच्या भरात अरविंदने सोबत आणलेल्या चाकूने राणी यांच्यावर चाकूने सपासप वार केले. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने राणी यांचा जागीच मृत्यू झाला. राणी या रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहून आरोपी अरविंद यानेही स्वत:वर वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. जखमी अरविंद याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पुढील तपास चिखली पोलीस करत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like