दाक्षिणात्य चित्रपट आणि क्राईम पेट्रोल पाहून अल्पवयीन मुलाकडून तरुणीचा खून

पोलिसनामा ऑनलाईन – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या चाकण हद्दीत एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा खून झाल्याची घटना घटली होती. तरुणीचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत आढळल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला होता. दरम्यान, तिच्याच नात्यातील अल्पवयीन मुलाने तरुणाचा खून केल्याचे उघड झाले आहे.

संबंधित तरुणी अल्पवयीन आरोपीला भारुडात स्त्री पात्र करत असल्याने महिलांसारखा वागतोस, बोलतोस असे हिणवत असे. याचा राग मनात धरून दाक्षिणात्य कंचना हा चित्रपट आणि क्राईम पेट्रोल, सावधान इंडिया असे गुन्हेगारीवर आधारित असलेल्या मालिका पाहून अल्पवयीनाने तरुणीचा खून करून पुरावे नष्ट केल्याची माहिती आरोपीने दिली आहे.

तरुणी नागपंचमी सणाची खरेदी करण्यासाठी करंजविहिरे याठिकाणी एकटीच गेली होती. दुपारनंतर तिचा फोन बंद लागत असल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला असता तिचा मृतदेह आढळून आला. चाकण पोलिसांनी अत्यंत बारकाईने तपास केला असता तरुणीच्या नात्यातील एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने घटनास्थळी न जाता तिच्या घरी जाऊन मृत्यू झाल्याचे सांगितले. आरोपी हा भारुडांच्या कार्यक्रमात स्त्रीचे पात्र साकारत असे. यावरून मयत अल्पवयीन तरुणी त्यांना ‘ महिलांसारखा काय वागतोस, त्यांच्यासारखा काय हसतोस’ असे बोलून हिणावत होती. या गोष्टीचा आरोपीला चीड आणि संताप होता. याचा राग मनात होता. त्यामुळे तिचा खून करण्याचे त्याने ठरविले. दाक्षिणात्य चित्रपट कंचना भाग एक आणि दोन, क्राईम पेट्रोल, सावधान इंडिया यासह अश्लील व्हिडिओ पाहण्याची सवय त्याला होती. यातूनच त्याने तिला संपवण्याची योजना आखली.