मुळशीत फिरायला घेऊन जाऊन तरुणाचा खुन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – फोन करुन बोलवून घेऊन तरुणाच्या डोक्यात व गळ्यावर वार करुन त्याचा खुन करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मुळशी तालुक्यातील जांबेत गावाजवळील कोलते पाटील डेव्हलपर्स यांच्या बांधकाम साईटच्या पाठीमागील बाजूच्या मैदानात बुधवारी सकाळी ९ वाजता हा प्रकार उघड झाला आहे.

निलेश शिवाजी नाईक (वय २४, रा. विघ्नहर्ता सोसायटी, सुसगाव, ता. मुळशी) असे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी विठ्ठल ज्ञानोबा मानमोडे (वय ३०, रा. विघ्नहर्ता बिल्डिंग, सुसगाव, ता. मुळशी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी कपिल भुपाल नाईक (वय ३४, रा. आडसरे बिल्डिंग, सुसगाव, ता. मुळशी) यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, निलेश नाईक हा मुळचा कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर येथील राहणारा आहे. बुधवारी सकाळी जांबेत गावाच्या हद्दीत कोलते पाटील डेव्हलपर्सच्या बांधकाम साईटचे पाठीमागे असलेल्या मोकळ्या मैदानात निलेश नाईक याचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता त्याच्या गळ्यावर, डोक्यात वार करुन त्यांचा खुन करण्यात आल्याचे लक्षात आले.

कपिल नाईक यांनी आपला भाचा निलेश नाईक याचा तो मृतदेह असल्याचे ओळखले. मंगळवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास त्यांनी निलेश नाईक याला फोन केला होता. त्यावेळी त्याने आपण विठ्ठल मानमोडे याच्याबरोबर असल्याचे सांगितले होते. ही माहिती मिळाल्यावर निलेश याच्या घराजवळ राहणाऱ्या विठ्ठल मानमोडे याच्या घरी पोलीस पोहचले. तेव्हा तो रात्रीच घर सोडून पळून गेल्याचे आढळून आले आहे. विठ्ठल मानमोडे यानेच निलेश नाईकचा खुन केल्याचे स्पष्ट होत असून खुनामागील कारण अजून उघडकीस आले नाही.