Pune News : तरुणीची हत्या की आत्महत्या ? चौकशी करण्याची भाजप महिला मोर्चाची मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील महंमदवाडी, हडपसर परिसरात रविवारी (दि.7) एका सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारुन पुजा चव्हाण (वय-22) तरुणीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही नक्की आत्महत्या आहे की हत्या ? याची चौकशी व्हावी अशी मागणी भाजपच्या महिला आघाडीने केली आहे. या बाबतची तक्रार वानवडी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. आज (बुधवार) महिला आघाडीच्या सदस्यांनी पोलीस आयुक्त पुणे शहर यांना निवेदन दिले.

सदर प्रकरण झाल्याचे कळाल्यानंतर नागरिकांनी पुजाला उपचारासाठी रुबी हॉल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु गंभीर जखमी झाल्यामुळे पुजाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणात असे समोर येत आहे की, महाराष्ट्रातील एका बड्या मंत्र्यासोबत प्रेमसंबंधातून या युवतीने आत्महत्या केल्याची चर्चा समाज माध्यमांवर सुरु आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

हा प्रकार अतिशय गंभीर असुन त्यासाठी या सर्व प्रकाराची सखोल चौकशी व्हावी आणि सदर प्रकरणातील गुन्हेगारांना लवकरात लवकर अटक करुन त्यांच्यावर कठोर शासन करावे, अशी मागणी भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या पुणे शहराध्यक्षा अर्चना तुषार पाटील यांनी वानवडी पोलिस ठाण्यात केली व पोलिस प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई चालु करवी. अन्यथा शहरभर तीव्र जनआंदोलन करण्यात येईल, असा इशारा पोलिस प्रशासनाला दिला.

यावेळी भाजपा महिला आघाडी पुणे शहराध्यक्षा अर्चना तुषार पाटील, नगरसेवक सुशिल मेंगडे, धनराज घोगरे, महिला आघाडी सरचिटणिस गायत्री भागवत, सोनाली शितोळे भोसले, प्रसिद्धी प्रमुख पुणे शहर महिला मोर्चा शहर उपाध्यक्ष अश्विनी मारणे (पवार), प्रसिद्धी प्रमुख पुणे शहर महिला मोर्चा सोनाली शितोळे भोसले, उज्वला गौड, वृषाली दुबे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.