सांगली : वाटणीसह कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाचा खून, अपघाताचा केला होता बनाव

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – कडेगाव तालुक्यातील अंबक फाट्यावरील सोनहीरा साखर कारखाना चौक येथील जागेच्या वाटणीसह कौटुंबिक वादातून नायलॉनच्या दोरीने गळा आवळून खून करणाऱ्या सख्या भावास व त्याच्या साथीदारास चिंचणी-वांगी पोलिसांनी अटक केली. खून केल्यानंतर संशयितांनी अपघाताचा बनाव केला होता. ही घटना शुक्रवार दिनांक २० सप्टेंबर रोजी रामापूर फाटा जवळ रात्री बाराच्या सुमारास घडली होती. शिवाजी बुरुंगले असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी शिवाजीचा भाऊ शंकर बुरुंगले, काशीलिंग मोहिते यांना अटक करण्यात आली आहे.

याप्रकरणी चिंचणी वांगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. २० सप्टेंबर रोजी रात्री शिवाजी कडेगाव वरून अंबक फाटाकडे दुचाकीवरून येत होता. यावेळी कडेगाव तडसर रस्त्यावर विक्रमनगरजवळ शिवाजी आला असता पाठीमागून दुचाकीवरून पाठलाग करत आलेला त्याचा भाऊ शंकर याने लोखंडी रॉड शिवाजी याच्या डोक्यात मारून पळून गेला. यानंतर शंकरने पुन्हा कडेगाव येथील खाजगी रुग्णालयात येऊन अपघाताचा बनाव करून शिवाजीला उपचारासाठी सांगलीला नेणार असल्याचे डॉक्टरांना सांगितले.

सांगलीला जाताना रामापूर फाट्याजवळ पोहचल्यावर शंकरने काशीलिंगच्या मदतीने नायलॉनच्या दोरीने शिवाजीचा गळा आवळला. नंतरही अपघाताचा बनाव करून शिवाजीला पुढे सांगलीतील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेले. परंतु तेथील डॉक्टरांनी शिवाजी मृत झाल्याचे घोषित केले. आरोपींनी खून करूनही अपघात झाल्याचा बनाव केला. चिंचणी वांगी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

Visit : policenama.com