नीरा : जामिनावर सुटलेल्या आरोपीचा खून, मृतदेहाची परस्पर लावली विल्हेवाट

नीरा  : पोलीसनामा ऑनलाइन  –  नीरा ( ता.पुरंदर) येथील एका घटनेतील जामिनावर वर सुटलेल्या आरोपीला हात पाय बांधून दांडक्याने मारून विषारी औषध पाजून जीवे मारल्याची धक्कादायक घटना उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना मंगळवारी (दि.१२) संध्याकाळी दगडेवस्ती येथे घडली. या घटनेची फिर्याद मयताच्या मुलीने निरा पोलिसांत दिली. यानंतर पोलिसांनी या घटनेतील आरोपींना अटक केली आहे.

या घटनेबाबत पोलिस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, नीरा (ता.पुरंदर) येथील दगडेवस्तीवरील बाबासाहेब उर्फ चेंड्या भिवाजी दगडे यावर २५ नोव्हेंबर २०१९ रोजी चुलतीवर बलात्कार केल्याप्रकरणी वडगांव निंबाळकर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल होऊन अटक झाली होती. त्यानंतर तो येरवडा कारागृहात होता. त्यानंतर बाबासाहेब हा ३ एप्रिल २०२० रोजी जामीनावर सुटून निरा – दगडेवस्ती येथे आला होता. त्यानंतर बाबासाहेब यांंची चुलती शारदा वसंत दगडे, चुलत भाऊ विक्रांत वसंत दगडे, अपर्णा चंद्रकांत वळकुंदे, करण उर्फ अमर चंद्रकांत वळकुंदे यांनी संगनमताने मागील घडलेल्या गुन्ह्याचा राग मनात धरून बाबासाहेब याचे मंगळवारी ( दि.१२) संध्याकाळी सहाच्या सुमारास हातपाय दोरीने बांधून बॅट व लाकडी दांडक्याने मारहाण करून विषारी औषध पाजून खून केला. व याची कुठे माहिती दिली तर तुला सुद्धा जिवे मारून टाकिन अशी धमकी फिर्यादीस दिली. तसेच खुन झालेला बाबासाहेब उर्फ चेंड्या भिवाजी दगडे (वय -४०) याच्या मृतदेहाचा परस्पर विल्हेवाट लावण्यासाठी मृतदेह अंत्यविधी करण्याकरिता वस्तीवरील टेंम्पोत टाकून नीरा येथील नदीकाठी नेला असल्याची फिर्याद मयताची मुलगी सिद्धी बाबासो दगडे (वय -१४) यांंनी नीरा पोलिस स्टेशनला दिली असून पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली आहे. या घटनेतील आरोपींंना गजाआड करण्यासाठी जेजुरीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अंकुश माने यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार नंदकुमार सोनवलकर , पोलिस नाईक राजेंद्र भापकर, पोलिस हवालदार सुदर्शन होळकर, पोलिस हवालदार गोविंद भोसले, पोलीस कॉन्स्टेबल निलेश जाधव यांनी सहभाग घेतला. या घटनेचा तपास नीरा पोलीस दुरक्षेत्राचे फौजदार विजय वाघमारे करीत आहे.