धक्कादायक ! बारामतीमध्ये आंतरजातीय लग्न केल्याने आईनेच पोटच्या मुलीचा केला डोक्यात दगड घालून खून

बारामती : पोलीसनामा ऑनलाईन – आंतरजातीय लग्न केल्याने जन्मदात्या आईनेच मुलीचा दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना बारामती शहरात घडली. खून केल्यानंतर आई स्वत: पोलीस ठाण्यात हजर झाली आहे. राज्यात ऑनर किलिंगच्या घडणाऱ्या घटनांनी महाराष्ट्र सध्या हादरला आहे. त्यानंतर ही घटना समोर आल्याने संपूर्ण राज्यभरात खळबळ उडाली आहे.

ऋतुजा हरिदास बोभाटे (वय १९) असे खून झालेल्या मुलीचे नाव आहे. तर संजीवनी हरिदास बोभाटे असे तिच्या आईचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ऋतुजा बोभाटे हिने काही दिवसांपुर्वीच एका तरुणाशी प्रेमप्रकरणातून आंतरजातीय विवाह केला होता. परंतु काही दिवसांपासून तो मुलगा तिला नांदवायला तयार नव्हता. ऋतुजाच्या आईने मुलाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचा काहीच परिणाम झाला नाही.

मुलीने तिच्या पतीविरोधात तक्रारही दिली होती. दरम्यान यामुळे आईसोबत ऋतुजाचे नेहमीच वाद होत होते. त्यानंतर खुनाच्या दिवशी आई आणि मुलीमध्ये कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर रागाच्या भरात आईने ऋतुजाच्या डोक्यात दगड घालून तिचा खून केला. त्यानंतर ती स्वत: पोलीस ठाण्यात हजर झाली.