जमिनीच्या वादातून वरिष्ठ पोलिस अधिकार्‍याचा घरात घुसून गोळ्या घालून खून

गोळया घालणारा पोलिस अधिकार्‍याच्या मुलीचा फेसबुक फ्रेंड

भोपाळ : वृत्‍तसंस्था – जमिनीच्या वादातून वरिष्ठ पोलिस अधिकार्‍याचा घरात घुसून गोळ्या घालून खून झाल्याची खळबळजनक घटना मध्यप्रदेशातील भोपाळ येथे बुधवारी रात्री उशिरा घडली आहे. थेट डीएसपीचा जमिनीच्या वादातून मर्डर झाल्याची माहिती समोर आल्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांची भंबरी उडाली आहे.

डीएसपी गोरेलाल अहिरवार असे खून झालेल्या अधिकार्‍याचे नाव आहे. ते मध्यप्रदेशच्या राज्य गुन्हे अन्वेषण विभागात (सीआयडी) कार्यरत होते. पोलिसांनी याप्रकरणी गोळ्या घालणार्‍या हिमांशू प्रताप सिंह याला अटक केली आहे. त्याच्याकडे केलेल्या चौकशीमधून त्याने जमिनीच्या वादातून हे कृत्य केल्याचे उघड झाले आहे. हिमांशू हा अहिरवार यांची मुलगी अनिता यांचा फेसबुक फ्रेंड देखील आहे. तो नेहमी डीएसपींच्या घरी येत-जात असत. बुधवारी रात्री सव्वा सात वाजण्याच्या सुमारास हिमांशू हा डीएसपी अहिरवार यांच्या घरी गेला. दोघांमध्ये काही काळ बोलणे चालु होते. त्यामध्येच त्यांच्यात वाद निर्माण झाला. वाद विकोपाला जात असल्याचे पाहून डीएसपींच्या मुलीने मध्यस्थी केली आणि हिमांशूला तेथुन निघुन जाण्यास सांगितले. रागाच्या भरात तो डीएसपींच्या घरातून निघुन गेला. काही वेळानंतर तो परतला आणि त्याने थेट डीएसपी अहिरवार यांच्यावर गोळीबार केला. त्यावेळी डीएसपींची मुलगी अनिता आणि सून राखी तेथे उपस्थित होत्या.

डीएसपींची सुन राखी यांनी लागलीच फोनकरून घटनेची माहिती पतीला दिली. त्यानंतर नातेवाईकांनी डीएसपींना रूग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. डीएसपी गोरेलाल अहिरवार यांनी भोपाळ येथे काही पोलिस ठाण्यात प्रभारी अधिकारी म्हणून काम केले होते. आरोपी हिमांशू याची आई अर्चना सिंह या पोलिस हवालदार आहेत. हिमांशूने नेमक्या कोणत्या जमिनीच्या वादातून डीएसपींचा गोळ्या घालून खून केला याचा तपास भोपाळ पोलिस करीत आहेत.