Pune News : कोथरूडमध्ये मतिमंद मुलीला दुसऱ्या मजल्यावरून खाली फेकून खून (व्हिडिओ)

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – कोथरुड भागात एका मतिमंद शाळेत अल्पवयीन मतिमंद मुलीने एका 33 वर्षीय मतिमंद मुलीला दुसऱ्या मजल्यावरून खाली फेकून खून केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सावली मतिमंद व बहुविकलांग प्रतिष्ठान येथे हा प्रकार घडला आहे.

ममता मोहन डोंगरे (वय 33) असे खून झालेल्या मुलीचे नाव आहे. याप्रकरणी कोथरुड पोलीस ठाण्यात 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अनिता टापरे यांनी तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डावी भुसारी कॉलनीत सावली मतिमंद व बहुविकलांग प्रतिष्ठान ही संस्था आहे. येथे मतिमंद व विकलांग मूल-मुलीचा सांभाळ केला जातो. यादरम्यान ममता या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या रॅम्पवर चालत होती. त्यावेळी अल्पवयीन मुलगी पाठीमागून आली. तिने ममता हिला पाठीमागून पकडले आणि उचलून थेट दुसऱ्या मजल्यावर नेले आणि तेथून खाली फेकून तिचा खून केला. हा प्रकार फिर्यादी यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. कोथरुड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर तपास करून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलगी मुंबई येथील आहे. तिला ताब्यात घेतले नसल्याचे सांगण्यात आले आहे. अधिक तपास कोथरुड पोलीस करत आहेत.