आर्थिक देवाण घेवाणीतून राष्ट्रवादी कार्यकर्त्याचा खून; दोघांना अटक

मंचर: आर्थिक देवाण घेवाणीतून धामणी (ता. आंबेगाव) येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा कार्यकर्ते सचिन राजाराम जाधव (वय ४२) यांचा खून करून मृतदेह आणि वाहन जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले. हि घटना पोंदेवाडी येथे मंगळवारी घडली असून सहा तासाच्या आत पोलिसांनी या प्रकरणी दोन जणांना जेरबंद करण्यात यश मिळवले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख यांनी दिली.

दरम्यान या खुनात चार आरोपी निष्पन्न झाले असून त्यातील मुख्य आरोपी बाळशीराम थिट, विजय सूर्यवंशी यांना अटक केली आहे. तर इतर दोन आरोपींना लवकरच ताब्यात घेऊ , असेही त्यांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सचिन जाधव मंगळवारी रात्री घरी न आल्याने त्यांचा पुतण्या रोहन जाधव याने मंचर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. बुधवारी सकाळी पोंदेवाडी-काठापूर रस्त्यालगत एका ठिकाणी काही नागरिकांना रक्ताचे शिंतोडे, चपलांचा जोड, कंगवा आढळून आला. त्यांनी याबाबत पोंदेवाडीचे सरपंच अनिल वाळुंज यांना माहिती दिली. वाळुंज यांनी याबाबत पोलिसांना कळवले. माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर अधीक्षक विवेक पाटील, उपविभागीय अधिकारी अनिल लंबाते, निरीक्षक सुधाकर कोरे यांनी धाव घेत पाहणी केली. घटनास्थळावरील परिस्थितीवरून पोलिसांनी खून झाल्याचा अंदाज लावत तपासाची चक्रे वेगाने फिरवली. जाधव यांच्या व्यवसायाच्या माहितीवरून पोलिस दोन तासात आरोपीपर्यंत पोहचले. यामध्ये चार आरोपी निष्पन्न झाले.

पोंदेवाडी फाट्यावर सचिन जाधव यांचा तीक्ष्ण हत्याराने निर्घृण खून करण्यात आला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी जाधव यांचा मृतदेह आणि गाडी याची नगर जिल्ह्यात पारनेर तालुक्यातील कोथरण खंडोबा परिसरातील घाटात विल्हेवाट लावायचा प्रयत्न केला असल्याचे पोलिसांनी सांगितले. अधिक तपास पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे करत आहे.