बियर बारमध्ये पट्ट्याने मारहाण करून पोलीस पाटलाचा खून

उदगीर : पोलीसनामा ऑनलाईन – शहरातील बीदर रोडवर असलेल्या एका बारमध्ये झालेल्या मारहाणीत अवलकोंडा येथील पोलीस पाटलाचा खून करण्याची खळबळजनक घटना घडली. पोलीस पाटील साहेबराव गुंडेराव मुस्कावाड (वय ३६, रा. अवलकोंडा) असे त्यांचे नाव आहे. ही घटना बुधवारी रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास घडली. उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले, उदगीर शहरातील बीदर रोडवर गोपाळ बार आहे. या बारमध्ये बुधवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास अवलकोंडा येथील पोलीस पाटील साहेबराव मुस्कावाड आणि इतर चार जणांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. यावेळी मारेकऱ्यांकडून मुस्कावाड यांना पट्ट्याने जबर मारहाण करण्यात आली. या मारहाणीमध्ये पोलीस पाटील मुस्कावाड हे गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेत त्यांना शहरातील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले.

घटनास्थळावरून मारेकरी फरार झाले आहेत. या घटनेचा क्रम बारमधील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. घटनेची माहिती मिळताच उदगीर पोलीस ठाण्याचे अधिकारी-कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी बारमधील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. पोलीस पाटील साहेबराव मुस्कावाड यांच्यावर बुधवारी रात्री बारमध्ये चौघा मारेकऱ्यांनी अचानक हल्ला केला. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. मारहाण कशामुळे झाली, याचे कारण मात्र समजू शकले नाही. पोलीस या घटनेचा वेगवेगळ्या बाजूंनी तपास करीत आहेत.

जाहिरात