भयानक ! आई-वडिलांनीच केला पोटच्या मुलाचा खून

हातकणंगले : पोलीसनामा ऑनलाईन – दारूच्या आहारी गेलेल्या मुलाच्या कृत्यांमुळे डोक्यावर कर्जाचा डोंगर झाला. त्यानंतर त्याचे लग्न केल्यावर विक्षिप्त स्वभावाला कंटाळून तीन महिन्यातच सून माहेरी निघून गेली. त्यामुळे मुलाच्या दारूच्या व्यसनाला आणि विक्षिप्त स्वभावाला कंटाळून आई वडीलांनीच नातेवाईकांसोबत मिळून २५ वर्षांच्या मुलाचा खून केल्याचा खळबळजनक प्रकार हातकणंगले तालुक्यात उघडकीस आला आहे.

अनिकेत अरुण वाळवेकर (वय २५, रा.पाटील टोप, ता. हातकणंगले) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर याप्रकरणी वडगाव पोलिसांनी आई रेखा अरुण वाळवेकर (वय ४०), वडिल अरुण सखाराम वाळवेकर (वय ५७), रेखा वाळवेकरचा मानलेला भाऊ सुरज रामचंद्र ठाणेकर (वय २५), बबलू उर्फ अविनाश जगताप (वय २२), अभिजीत दिनकर सुर्यवंशी (वय २८, रा. मनपाडळे, ता. हातकणंगले) यांना पोलिसांनी अटक केली आहे.

असा लागला छडा

चार दिवसांपुर्वी अंबपवाडी रस्त्यावरील महिपती पाटील यांच्या विहिरीत नायलॉन दोरीने गळा व हातपाय बांधलेल्या अवस्थेत अज्ञात तरुणाचा मृतदेह सापडला. तो सडलेल्या अवस्थेत होता. दरम्यान त्याचा खून करून मृतदेह येथे टाकल्याचे समोर येताच पोलिसांनी तपासाला वेगाने सुरुवात केली. त्यानंतर पोलिसांना माहिती मिळाली की गेल्या आठ दिवसांपासून टोप येथील एक तरुण बेपत्ता आहे. त्याची पोलीस ठाण्यात नोंद नाही. त्यामुळे खून झाला असल्याच्या संशयावरून त्याच्या आई वडिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशी केली तेव्हा त्यांनी खून केल्याचे सांगितले.

मुलाचे दारूचे व्यसन आणि विक्षिप्त स्वभाव

रेखा वाळवेकर या मुळच्य़ा मनपाड़ळे गावच्या आहेत. त्यांचे सासर सांगली जिल्ह्यातील आहे. परंतु कामानिमित्त त्या टोप येथे पतीसह स्थायिक झाल्या. अनिकेत वाळवेकर याला दारूचे व्यसन जडले. त्यानंतर त्याने आई वडिलांनी व्यवसायासाठी दिलेले ३ डंपरदेखील विकून टाकले आणि कुटुंबावर कर्जाचा डोंगर झाला. त्यानंतर मागील तीन महिन्यांपुर्वी त्याचे लग्न झाले होते. परंतु त्याच्या दारूच्या व्यसनाला आणि भांडणांना कंटाळून त्याची पत्नी माहेरी इचलकरंजीला निघून गेली.

काय घडलं नेमकं ?

अनिकेत वाळवेकर हा दारूच्या नशेत मागील शनिवारी रात्री घरी आला. त्याने आई वडीलांकडे २ लाख रुपयांसाठी वाद घातला. त्यानां मारहाणही करू लागला. त्यावेळी आई वडीलांनी त्याला घरातील किटकनाशक पाजले. त्यानंतर तो आरडाओरडा करत मला ठार मारण्यासाठी विषारी औषध पाजले असे म्हणू लागला. त्याचवेळी तेथे थांबलेल्या सुरज ठाणेकर, बबलू जगताप यांच्यापैकी सुरजने त्याचा गळा दाबला. तर बबलूने त्याचे हात पाय पकडले अशी त्यांनी कबूली दिली.

त्यानंतर त्यांनी अनिकेतचा मृतदेह जाळून टाकण्याचे ठरवले. परंतु हे सर्वांना कळू शकते. म्हणून त्यांनी ठाणेकर याच्या टेम्पोसाठी लागणारी नायलॉनची दोरी आणली. अनिकेतचा मृतदेह मोटरसायकलवरून नेत मनपाडळे येथील महिपती पाटील यांच्या शेतातील विहिरीत टाकला.