मीरा रोड येथे 2 बार कर्मचार्‍यांचा खून

मुंबई : मीरा रोड येथे एका बारमधील दोघा कर्मचार्‍यांची हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. नरेश पंडित (वय ५२) आणि हरेश शेट्टी (वय ४८) अशी या बार कर्मचार्‍यांची नावे आहेत. मीरा रोडच्या शीतलनगरमधील एमटीएनएल मार्गावरील शबरी बार अँड रेस्टॉरंटमध्ये ते दोघे बार कर्मचारी होते. गुरुवारी दिवसभर ते दोघे न दिसल्याने बारचे मालकाने त्यांचा शोध घेतला, तेव्हा पाण्याच्या टाकीत त्यांचे मृतदेह तरंगत असल्याचे आढळून आले. त्यानंतर रात्री उशिरा बार मालकाने पोलिसांना याची माहिती दिली. ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड, अपर पोलीस अधीक्षक संजय पाटील यांच्यासह पोलीस अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट देऊन घडलेल्या प्रकाराची माहिती घेतली. पोलीस निरीक्षक संदीप कदम यांना हत्येच्या तपासाबाबत सूचना दिल्या.

दोघांच्या शरीरावर आणि डोक्यावर जखमा आढळून आल्या आहेत. हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. तसेच त्यांची हत्या कधी झाली व मृतदेह कधी पाण्याच्या टाकीत टाकले यांची माहिती अद्याप पुढे आलेली नाही.