Pune News : आळेफाटा येथे खूनाच्या घटनेने खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – एका अज्ञात इसमाचा डोक्यात सिमेंटचा ब्लॉक टाकून खून केल्याची धक्कादायक घटना आळेफाटा येथे उघडकीस आली आहे. अद्याप मृतदेहाची ओळख पटलेली नाही. बाहेरगावाहून येथे कामाला आलेला हा इसम असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

याबाबत आळेफाटाचे पोलिस निरीक्षक मधुकर पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, आळेफाटा (ता. जुन्नर) येथे बस स्थानकाच्या मागील बाजूस सरंक्षण भिंतीच्या आत असलेल्या मोकळ्या जागेत एका अज्ञाताचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

पाहणी करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र आळे येथे पाठवले आहे. मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही. बाहेरगावाहून कामाला आलेला हा इसम असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. परिसरातील सर्व दुकानांमधील सीसीटीव्ही फुटेजची पोलीस तपासणी करत आहेत. पोलिस निरीक्षक मधुकर पवार तपास करत आहेत.