दिल्लीत सॉफ्टवेअर इंजिनिअरने पत्नीसह ३ मुलांचा केला खून

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सॉफ्टवेअर इंजिनिअरने आपल्या पत्नीसह ३ मुलांची हत्या केल्याचा खळबळजनक खुलासा व्हॉट्सअ‍ॅपवर केल्याने संपूर्ण दिल्ली हादरुन गेली आहे. सुमित इंदिरापूरम असे या सॉफ्टवेअर इंजिनिअरचे नाव आहे. त्याने पत्नी अंशु (वय ३२), मुलगा परमेश (वय ५) आणि आकृती व आरव या ४ वर्षाच्या दोन जुळ्या मुलांचा खून केला आहे. शनिवारी रात्री ३ वाजता त्याने या चौघांचा चाकूने भोसकून खून केला. त्यानंतर फ्लॅट बंद करुन तो पळून गेला आहे.

सुमित याची नोकरी सुटली आहे. त्यातूनच कुटुंबात सातत्याने वाद होत होते. त्यामुळे त्याने हे कृत्य केल्याचा संशय त्याच्या कुटुंबाने व्यक्त केला आहे. हा प्रकार केल्यानंतर त्याने रविवारी सायंकाळी ६ वाजता आपल्या कुटुंबाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर एक व्हिडिओ टाकला. त्यात त्याने आपण कुटुंबाची हत्या केली असून मी आता आत्महत्या करायला जात असल्याचे देखील म्हटले आहे. हा व्हिडिओ पाहिल्यावर कुटुंबाने तातडीने पोलिसांशी संपर्क साधला. मात्र, हा व्हिडिओ पाठविल्यानंतर त्याने मोबाईल बंद केला आहे. पोलिसांनी सुमितचा शोध घेण्यासाठी दिल्लीतील विविध ठिकाणी पथके पाठविली आहेत.