तासगाव: अनैतिक संबंधातून तरूणाचा दारूतून विष पाजून खून, प्रचंड खळबळ

तासगाव: अनैतिक संबंधातून दारूतून विष पाजून तरुणाचा खून केल्याची घटना नागाव-कवठे (ता. तासगाव) येथे गुरुवारी उघडकीस आली. अभिजित सुधाकर नवपुते (वय ३५, रा. औरंगाबाद) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान याप्रकरणी संशयित प्रशांत अशोक पाटील (वय ३७, रा. कुमठे) याने स्वतः पोलीस ठाण्यात हजर होत खुनाची कबुली दिली. याबाबतची फिर्याद पोलीस पाटील मल्हारी पाटील (रा.कवठेएकंद) यांनी दिली आहे. दरम्यान, घटनास्थळाची पाहणी अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले, पोलीस उपअधीक्षक अश्विनी शेंडगे, पोलीस निरीक्षक संजीव झाडे, पंकज पवार यांनी करून तपासाबाबत पोलिसांना सूचना केल्या.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कुमठे येथे अभिजित हा महावितरणचा वायरमन म्हणून काम करत होता. त्या ठिकाणी अभिजीत आणि प्रशांत यांची ओळख झाली. दरम्यान अभिजीतची पत्नी आणि प्रशांत यांचे अनैतिक संबंध असल्याचे अभिजीतला समजले.त्यामुळे दोघांमध्ये वाद सुरु झाला होता. त्यातून प्रशांतने अभिजितला संपविण्याचा निश्चय केला. त्यानुसार रविवारी (दि ९) सकाळी तासगाव-सांगली रस्त्यावरील बंद पडलेल्या पेट्रोल पंपाजवळ प्रशांत अभिजीतला बोलावले. त्यावेळी अभिजीतला विष मिसळलेली दारू प्रशांतने जबरदस्तीने पाजली. त्यात त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर अभिजितचा मृतदेह पेट्रोल पंपाशेजारी असलेल्या स्वच्छतागृहात प्रशांतने टाकून दिला. मृतदेहावर शेतातील माती आणून टाकून तो बुजवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान गुरुवारी सकाळी तासगाव पोलिस ठाण्यात संशयित प्रशांत हा स्वतःच हजर होत अभिजित याचा खून केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन घटनास्थळाची पाहणी केली.