शेती कसण्याच्या वादातून मोठ्या भावाने केला लहान भावाचा खून

येवला/नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – शेती कसण्यावरुन झालेल्या किरकोळ वादातून सख्या मोठ्या भावाने लहान भावाचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भावा-भावाच्या नात्याला काळीमा फासणारी ही घटना नाशिक जिल्ह्यातील येवल्यातील चांदगावात घडली आहे. घटनेनंतर आरोपी मोठ्या भावाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. साहेबराव कांदळकर असे खून झालेल्या लहान भावाचे नाव आहे.

याप्रकरणी आरोपी नंदू कांदळकरला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येवल्यापासून जवळ असलेल्या चांदगाव येथे हे दोन सख्ख्ये भाऊ वेगवेगळे आपल्या कुटुंबासमवेत राहतात. या दोघांकडे तीन-तीन एकर शेत जमीन आहे. जमीन कसण्यावरून या दोघांमध्ये नेहमीच वाद होत होते. आज (सोमवार) याच वादातून पुन्हा दोघांमध्ये वाद झाले.

दोघांनी एकमेकांना शिविगाळ केली. या वादाचा रुपांतर हाणामारीत झाले. संतापलेल्या नंदूने साहेबरावच्या डोक्यात लाकडी दांडक्याने जोरदार प्रहार केला. हा प्रहार एवढा जोरात होता की, साहेबराव जागेवरच कोसळला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषीत केले. दरम्यान, साहेबराव रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहून नंदूने घटनास्थळावरून पलायन केले.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपी नंदूचा शोध घेऊन त्याला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी त्याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहे. किरकोळ कारणावरून दोन भावात झालेल्या वादामुळे दोन कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत.