पिंपरीत अनैतिक संबंधाच्या संशयावरून भाऊजीचा खून

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – बहिणीच्या नवऱ्याचे बाहेर अनैतिक संबंध असल्यामुळे बहिणीला त्रास दिला जात असल्याच्या संशयावरून कोयत्याने वार करून बहिणीच्या पतीचा खून केला. ही धक्कादायक घटना रविवारी रात्री भोसरी परिसरात घडली आहे. पोलिसांनी खून करणाऱ्यास अटक केली आहे.

मोहन बाबुराव लेवडे (45, रा. भोसरी) असे खून झालेल्याचे नाव आहे. तर पत्नी नंदा मोहन लेवडे (34) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विष्णू मुंजाजी जगाडे (30) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विष्णू हा नंदा यांचा भाऊ आहे. नंदाचे पती मोहन यांचे बाहेर अनैतिक संबंध आहेत, असा संशय विष्णूला होता. नंदा आणि मोहन यांच्यामध्ये वारंवार भांडण होत होती. बाहेर असलेल्या अनैतिक संबंधामुळे ही भांडणे होत असल्याचा संशय विष्णूला होता. त्यामुळे ही भांडणे सोडविण्यासाठी विष्णू मागील काही दिवसांपूर्वी बहीण नंदा यांच्या घरी आला होता.

रविवारी रात्री सर्वांनी एकत्र जेवण केले. जेवण झाल्यानंतर विष्णू आणि मोहन यांच्यामध्ये शाब्दिक वाद सुरू झाले. त्यातून चिडलेल्या विष्णूने लोखंडी कोयत्याने वार करत मोहन यांचा खून केला. तपास भोसरी पोलीस करीत आहेत.