मेहकर : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा आवळून खून

डोणगाव : पोलीसनामा ऑनलाइन – चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शेलगाव देशमुख (ता. मेहकर) येथे बुधवारी (दि. 3) रात्री ही घटना घडली आहे. या प्रकरणी डोणगाव पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.

नर्मदा गणेश पहारे (वय 37) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर गणेश भिकाजी पहारे असे अटक केलेल्या आरोपी पतीचे नाव आहे. प्रकरणी मतय नर्मदाचा भाऊ रवी सुखेदव सिमरे (रा. मालेगाव, जि. वाशिम) यांनी डोणगाव पोलिसात फिर्याद दिली आहे.

डोणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश पहारे याचे नर्मदाबाई हिच्याशी 2002 मध्ये लग्न झाले होते. या दाम्पत्याला एकूण पाच अपत्ये आहेत. मात्र गणेश पहारे हा पत्नीच्या चारित्र्यावर नेहमीच संशय घेत असत. त्यातून तिला शारीरिक व मानसिक त्रास देत होता. याच कारणावरून बुधवारी (दि. 3) रात्री उभयतांमध्ये पुन्हा वाद झाला. त्यावेळी रागाच्या भरात आरोपीने पत्नी नर्मदा हीचा गळा आवळून खून केला. घटनेची माहिती मृत नर्मदाचा भाऊ रवी सिमरे याला मिळाली. त्यावरून त्याने डोणगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रार आणि वैद्यकीय अधिका-यांचा शवविच्छेदन अहवाल याचा आधार घेत आरोपी गणेश पहारे याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक शिवाजी राठोड हे करीत आहेत.