एकीचं दोघांसोबत ‘लफडं’ जीव गेला मात्र तिसर्‍याचाच

लातूर/अहमदपूर : पोलीसनामा ऑनलाइन – एकाच महिलेशी दोघांचे संबंध होते. त्यातून त्या दोघांची हाणामारी झाली. त्यावेळी त्या ठिकाणी आलेल्या एका अन्य व्यक्तीला मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना अहमदपूर तालुक्यातील थोडगा येथे सोमवारी (दि.9) उघडकीस आली.

थोडगाव येथील गौतम पंढरी कांबळे (वय-55) हे शहरातील एका हॉटेलमध्ये कामाला होते. रविवारी (दि. 8) साडेसात वाजता हॉटेलमधील आपले काम संपवून ते बाहेर पडले. पण, सकाळपर्यंत घरी पोहचले नाहीत. त्यामुळे कुटुंबियांनी त्यांचा शोध घेतला. सोमवारी सकाळी थोडगा रोडवरील निजवंते चौकात पानटपरीच्या पाठीमागे त्यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळला. त्यांच्या डोक्यात लाकडी बाक घालून खून करण्यात आला होता.

याप्रकरणी गौतम कांबळे यांचा मुलगा शशिकांत कांबळे यांनी फिर्याद दिली. त्यांच्या फिर्य़ादेवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या तपासात इसा रहमातुला तांबोळी (रा. अहमदपूर) आणि हावगी नारायण कल्याणे (रा. लोहा) या दोघांनी हा गुन्हा केल्याचे समोर आले. या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशी दरम्यान या दोघांचे एकाच महिलेवर प्रेम असल्याचे उघडकीस आले. यातूनच रविवारी रात्री त्यांच्यात भांडण झाले. हा वाद विकोपाला गेल्याने आणि दारुच्या नशेत त्या टपरीतील बाक उचलून एकमेकांना मारत होते. त्यावेळी कांबळे त्याठिकाणी आले.

तांबोळी आणि कल्याणे या दोघांच्या भांडणात बाक कांबळे यांना लागले. कांबळे यांच्या डोक्यात बाक बसल्याने ते गंभीर जखमी झाले. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी तांबोळी कल्याणे यांना अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपविभागीय अधिकारी अश्विनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, पोलीस उप निरीक्षक गजानन अन्सापुरे करीत आहेत.

Visit : Policenama.com 

You might also like