नांदेड जिल्ह्यातील तृतीयपंथीयाचा लातुरमध्ये खून, आरोपीला 3 दिवसाची कोठडी

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्ह्यातील ब्रम्हवाडी पाटी (ता. चाकूर) परिसरात नांदेड जिल्ह्यातील तृतीयपंथीयाचा खून करण्यात आल्याची घटना 8 डिसेंबर रोजी घडली होती. पोलिसांनी याप्रकरणी एकाला अटक केली आहे.  न्यायालयाने त्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
नांदेड जिल्ह्यातील चक्री (ता. हदगाव) येथील मूळचा रहिवासी असलेल्या एका तृतीयपंथीयाचा बोकनगाव तांडा (लातूर) येथील सुनील मोतीराम राठोड याच्याशी ओळख झाली. मयत तृतीयपंथी आणि अटकेतील सुनील हे दोघेही चापोली (ता. चाकूर) येथून लातूरच्या दिशेने निघाले होते. दरम्यान, लातूर – नांदेड महामार्गावरील ब्रम्हवाडी पाटी येथे दोघांमध्ये भांडण झाले. यावेळी सुनील राठोड याने तृतीयपंथीयाच्या डोक्यात काठीने मारहाण केली. त्यामध्ये तो बेशुध्द पडला. त्यास ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याप्रकरणी चाकूर पोलीस ठाण्यात खूनाचा FIR दाखल करण्यात आला.

याप्रकरणी पोलिसांनी सुनील मोतीराम राठोड याला ताब्यात घेतले. सखोल चौकशी केली असता  खुनाचा उलगडा झाला. त्याला चाकूर न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.