खळबळजनक ! पत्नीचा चारित्र्याच्या संशयावरून खून, डेडबॉडी ड्रममध्ये ठेवून टाकली मुंबई-पुणे महामार्गावरील झाडीत

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करून पुरवा नष्ट करण्यासाठी मृतदेह ड्रमध्ये भरून मुंबई-पुणे महामार्गावरील झाडीत टाकून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावला असून आरोपी पती आणि गुन्ह्यात मदत करणाऱ्या मित्राला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

निलम तिवारी असे मृत महिलेचे नाव आहे. तर पती अंबुज तिवारी आणि त्याचा मित्र श्रीकांत चौबे या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलम आणि अंबुज हे घणसोलीमध्ये राहतात. पति अंबुज हा पत्नि निलम हिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. 22 जुलै रोजी सायंकाळी निलम आणि अंबुज अचानक गायब झाले होते. अंबुजच्या वडिलांनी मुलगा आणि सुन बेपत्ता झाल्याची तक्रार रबाळे पोलीस ठाण्यात दिली.

पोलिसांनी तपास सुरु केला असता अंबुज 28 जुलै रोजी घणसोली परिसरात आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून केल्याची माहिती पोलिसांना दिली. पत्नी निलिमा हिला घणसोलीमध्ये राहणाऱ्या मित्राच्या घरी नेऊन तिचा ओढणीने गळा आवळून खून केला. तसेच तिचा मृतदेह मित्राच्या मदतीने एका ड्रममध्ये भरून ड्रम मुंबई-पुणे महामार्गावरील खोपोली येथील झाडीत फेकून दिल्याची माहिती आरोपी पतीने पोलिसांना दिली.

पोलिसांनी या गुन्ह्यात वापरलेला टेम्पो जप्त करून पती आणि त्याच्या मित्राला अटक केली. तसेच त्यांनी ज्या ठिकाणी मृतदेह फेकून दिला होता त्या ठिकाणावरून मृतदेह ताब्यात घेतला. ही कारवाई पोलीस आयुक्त संजय कुमार, सहआयुक्त राजकुमार व्हटकर, उपायुक्त पंकज डहाणे, सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक वस्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे, उमेश गवळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम निंबाळकर, प्रविण फडतरे यांच्या पथकाने केली.