अनैतिक संबंधाला अडथळा ठरणाऱ्या पतीचा खून 

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – नागपूरमध्ये प्रिंटिंग प्रेस व्यावसाय करणाऱ्या संजय धनंजय चव्हाण यांच्या खूनाचा छडा हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या पोलीसांनी अवघ्या २४ तासात लावला आहे. अनैतिक संबंधनाला आड येत असल्याने पत्नीनेच पतीचा सुपारी किलरकडून खून करून घेतला असल्याचे सत्य पोलीस तपासात उघडकीस आली आहे. या खूनाच्या प्रकरणी पत्नी स्नेहा, तिचा प्रियकर योगेश पुरुषोत्तम गहाणे यांच्या सह प्रकाश चंद्रशेखर जवादे (रा. चंद्रनगर, पारडी) आणि आकाश ऊर्फ बिट्टू ओमप्रकाश सोमकुंवर यांना पोलीसांनी अटककेली आहे. या घटनेतील विशेष बाब म्हणजे प्रकाश जवादे हा सहआरोपी पोलीस कर्मचारी आहे.

संजय चव्हाण हे गणेश अपार्टमेंट, दिघोरी येथे पत्नी स्नेहा आणि पाच वर्षीय मुलासह राहतात. त्यांची गणेश पेठ येथे प्रिंटिंग प्रेस होती. घराच्या बाजूलाच राहणाऱ्या योगेश गोहणे सोबत संजय यांची पत्नी स्नेहा हिची मैत्री झाली. मैत्रीचे नाते प्रेम संबंधात बदलले आणि दोघांमध्ये संजय यांच्या घरीच शरीर संबंध देखील सुरु झाले. संजय प्रिंटींग प्रेस मध्ये गेले कि पत्नी स्नेहा तिचा प्रियकर योगेश याला घरी बोलवत होती आणि त्याच्या सोबत शरीर संबंध ठेवत होती. मागील दोन वर्षापासून हा दिनक्रम सुरु होता. दोघांच्या प्रेमाला पती संजय अडथळा ठरू लागला होता म्हणून पत्नी स्नेहाने त्याला सुपारी देऊन ठार मारण्याचा इरादा केला. त्यासाठी तीने लाखात रक्कम मोजण्याची देखील तयारी दाखवली. संजय चव्हाण यांचा खून करण्यासाठी प्रियकर योगेशने मित्र प्रकाश जवादेची मदत घेण्याचे ठरवले. प्रकाश जवादे हा नागपूर पोलीस मुख्यालयात पोलीस कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. प्रियकर योगेशने संजय चव्हाण यांना पार्टीच्या बहाण्याने विहीरगावजवळच्या हायलॅण्ड ढाब्यावर नेले. त्यावेळी पोलीस कर्मचारी प्रकाश जवादे देखील सोबत होता. योगेशने संजय चव्हाण यांना दारू पाजली. अतिप्रमाणात दारू पाजल्याने संजय चव्हाण यांचे शरीरावरील नियंत्रण सुटले. तेवढ्यात सुपारी किलर सोमकुंवर आणि त्याचे साथीदार त्या ठिकाणी पोचले. योगेशने संजय चव्हाण यांना आपल्या गाडीवर बसवले आणि ढाब्यावरून निर्जन ठिकाणी घेऊन गेले.

ओरिएन्टल कंपनीजवळ सुपारी किलरने दारूच्या नशेत असणाऱ्या संजय चव्हाण यांचा धारदार शस्त्राने सपासप वार करून खून केला. तसेच त्यांच्या मृतदेहाची ओळख पुसण्यासाठी दगडाने चेहरा ठेचला. त्यानंतर मृतदेह नाल्याजवळ फेकला. संजय चव्हाणचा अपघात झाला आहे असे चित्र आरोपीने घटनास्थळी तयार केले आणि सर्वजण पसार झाले. तपास करत असताना पोलीस योगेश आणि संजय दारू पिलेल्या ढाब्यावर गेले. त्या ठिकाणी लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे पुटेज पोलीसांनी तपासले. त्यामध्ये त्यांना योगेश संजयला घेऊन धाब्यावर आल्याचे स्पष्ट दिसले. त्यानंतर पोलीसांनी योगेशला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान पोलीसांना उत्तर देताना योगेश गरबडला तेव्हा त्याने गुन्ह्याची कबुली दिली. खून करण्यासाठी संजय चव्हाण यांची पत्नी स्नेहा हिने सुपारी किलरला ३ लाख रुपये देखील दिल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. तसेच सुपारी किलर अद्याप हि फरार असल्याचे पोलीसांनी सांगितले आहे.