पुणे : किरकोळ वादातून एकाचा खून करणारा अटकेत

पुणे/देहूरोड : पोलीसनामा ऑनलाइन – सरपण विकण्याच्या कारणावरून बेदम मारहाणीत एकाचा खून झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. याप्रकरणी देहूरोड पोलिसांनी दोघांना अटक केली असून ही घटना देहुगाव येथील झेंडेमळा येथे घडली. रामदास बाजीराव मेंगळे असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर बबन बाळु मेंगळे आणि गणपत बारकु मेंगळे या दोघांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शाम मेंगळे आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब झेडेमळा येथे शेतात काम करतात. शेतातच एका झोपडीत ते राहतात. मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास फिर्यादी शाम यांची पत्नी जिजा आणि भाऊ रामदास यांच्यामध्ये सरपण विकण्यावरुन वाद झाले होते. याच वादातून पत्नी जिजा हिने भाऊ बबन मेंगळे याला फोन करून घडलेला प्रकार सांगितला.

रात्री साडेसातच्या सुमारास बबन मेंगळे हा त्याचा चुलत भाऊ गणपत मेंगळे याला घेऊन झेंडेमळा येथे आला. या दोघांनी कुटुंबातील सर्वांना लाकडी दांडक्याने आणि लोखंडी पाईपने बेदम मारहाण केली. मारहाण करून ते फिर्य़ादी यांच्या पत्नीला घेऊन गेले.

दरम्यान, रात्री दहाच्या सुमारास शाम यांनी भावाला उठवण्याचा प्रयत्न केला मात्र, भाऊ रामदास हा निचपीत पडला होता. शेजाऱ्यांच्या मदतीने पोलिसांना बोलावून घेत त्याला पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले. देहूरोड पोलिसांनी आरोपींना अटक केली असून पुढील तपास देहूरोड पोलीस करीत आहेत.