मशरूम खाण्याचे ‘हे’ आश्चर्यकारक फायदे तुम्हाला माहित आहेत का ?

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   वनस्पती आणि प्राणी या दोन्हींचे गुणधर्म मशरूम्समध्ये असतात. वनस्पतीत आढळणारं ड जीवनसत्व त्यात असतं. मशरूम्स लो कॅलरी, लो सोडियम आणि फॅट फ्री असल्यानं त्यांच्या सेवनामुळं वजन आटोक्यात राहू शकतं. फळांमप्रमाणे मशरूम्स देखील ग्लुटेन फ्री असतं. मशरूम हा बी जीवनसत्वाचा एक चांगला स्रोत आहे. मशरूम पटकन शिजतात. सुप, पुलाव, भाज्या यात त्यांचा उपयोग केला जातो. फक्त मशरूम खाण्यायोग्य आहेत की, नाही हे बघून घ्यावं लागतं. कारण काही मशरूम्स विषारी असतात.

मशरूम ही फळभाजी पूर्णपणे सेंद्रीय असते. त्यामुळं त्यात रासायनिक पदार्थांचा वापरच होत नाही. त्यामुळं ती भेसळ करून बनवता येत नाही. यातील प्रोटीन्स हे प्राथमिक दर्जाचे आहेत. म्हणजे जसे शरीराला हवे आहेत तसे आहेत. डाळ बदाम, यातही प्रोटीनचं प्रमाण जास्त आहे. परंतु ते दुय्यम दर्जाचं आहे.

लग्न समारंभात मशरूम या भाजीला मानाचं स्थान आहे. प्रोटीनसाठी अनेकदा मटन, मासे, दूध, सोयाबीन याचा वापर केला जातो. परंतु शुन्य कोलेस्ट्रॉल असणारा हा पदार्थ म्हणून याची ओळख आहे.

मशरूम तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल म्हणजे शेतीत ज्याला टाकाऊ पदार्थ म्हणून ओळखलं जातं अशी सोयाबीन आणि गव्हाची गुळी, शिवाय साखर कारखान्यात शिल्लक राहिलेला बगॅस (उसाचा रस काढून शिल्लक राहिलेला चोथा) याला सर्वाधिक महत्त्व आहे. 25 दिवसात या कच्च्या मालाचं खत तयार केलं जातं. त्यात कोंबडीची विष्ठा, जिप्सम, डिओसी मिसळून त्यानंतर मशरूमचं उत्पादन मिळवण्यासाठी 50 दिवसांचा कालावधी लागतो. पुढील 15 ते 20 दिवस हे उत्पादन विक्रीसाठी उपलब्ध होतं.

1968 साली आपल्या देशात आयसीएआर दिल्ली येथे हिमाचल प्रांतातील सोलन येथे मशरूमचं संशोधन करणारं केंद्र सुरू झालं. मशरूम म्हणजे बुरशीवर्गीय भाजी आहे. याचे जगभरात सुमारे 17 ते 18 हजार प्रकार आहेत. मात्रा खाण्यासाठी बटन मशरूम, ऑईस्टर, मिल्की या तीन प्रकारांना सर्वाधिक मागणी आहे. उर्वरीत प्रकाराचे औषधी आणि विविध लाभ आहेत.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.