लग्नात गाणी वाजवणे पडणार महागात … 

वृत्तसंस्था : भारतीय लग्न  पद्धतीत संगीताला अनन्यसाधारण महत्व आहे. संगीताशिवाय भारतीय लग्नपद्धती अधुरीच आहे असे म्हंटले तरी चालेल. त्यातही बॉलिवूड चित्रपटांमधील लग्नावर चित्रित झालेली गाणी लग्नात आवर्जून वाजवली जातात. पण आता लग्नाच्या व्हिडिओत वाजवली जाणारी गाणी महागात पडू शकतात . कारण लग्नाच्या  व्हिडिओत टी  सिरीज ने बनवलेली गाणी वाजवणे म्हणजे कॉपीराइटचं उल्लंघन असल्याचा दावा कंपनीने केला आहे. एवढेच नाही तर अनेकांना टी सिरीज ने नोटीस देखील पाठवली आहे. तसेच १०० पेक्षा अधिक जणांवर गुन्हे दाखल केले आहेत .
एका हिंदी वृत्तपत्राने  दिलेल्या वृत्तानुसार, टी सीरिजने आपली गाणी व्हिडीओ अल्बममध्ये वापरल्याप्रकऱणी पंजाब, हरियाणा, झारखंड आणि गुजरातसहित अनेक राज्यांमधील १०० हून अधिकार फोटोग्राफर्सना नोटीस पाठवली आहे. या सर्वांवर कॉपीराइट कायद्यांतर्गत गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. इतकंच नाही तर कंपनीने गेल्या दोन महिन्यात फक्त हरियाणामधील ३० दुकानदारांना नोटीस पाठवली आहे. गाणी वापरायची असल्यास परवाना घ्यावा लागेल असं कंपनीचं म्हणणं आहे.
टी सीरिजने केलेल्या कारवाईवर ५० हजार फोटोग्राफर्सनी नाराजी व्यक्त केली आहे. परवाना घेणं सोपं नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. परवाना जरी घेतला तरी व्यवसायावर फरक पडेल. दर वाढवावे लागतील असंही ते म्हणाले आहेत. असोसिएशन आणि टी सीरिजमध्ये चर्चा सुरु असून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. दुसरीकडे लग्नाचे व्हिडीओ तयार कऱणाऱ्या दुकानदारांनी प्रतिज्ञापत्र घेण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये आपला अल्बम सोशल मीडियावर शेअर करण्यात येणार नाही तसंच व्यवसायिक वापर केला जाणार नाही असं लिहिण्यात आलं आहे.
याप्रकरणी टी सीरिजचे अँटी पायरसी मॅनेजर विपीन कुमार यांचं म्हणणं आहे की, कंपनीने देशभरातील १०० दुकानदारांवर गुन्हा दाखल केला आहे. हे सर्व विना परवाना गाणी वापरत होते. आपल्या व्यवसायासाठी गाण्यांचा वापर करायचा असेल तर परवाना घेणं अनिवार्य आहे असं त्यांनी सांगितलं आहे.