विधायक ! 3 मुस्लिम भावांनी ‘जाणवं’ घालून ब्राम्हण काकांचे केले अंत्यसंस्कार, ‘मुखाग्‍नी’ देणार्‍यानं केलं ‘मुंडन’

अमरेली : वृत्तसंस्था – गुजरातमधील अमरेली जिल्ह्यात सामाजिक बंधुतेचे एक उत्तम उदाहरण समोर आले आहे. तीन मुस्लिम भावांनी हिंदू परंपरेनुसार त्यांच्या ब्राह्मण काकांचे अंतिम संस्कार केले आहेत. मृत भानुशंकर पांड्या या तिन्ही मुस्लिम बांधवांचे वडील भिखू कुरेशी यांचे मित्र होते. आपल्या धर्मावर विश्वास ठेवणारे हे तीन भाऊ जानवे परिधान करून आपल्या हिंदू काकांच्या अंत्यविधीस उपस्थित होते. अमरेलीतील सावरकुंडला शहराचे भानुशंकर पांड्या अनेक वर्षांपासून या मुस्लिम कुटुंबात राहत होते.

अबू, नसीर आणि जुबैर कुरेशी अशी या तीन भावांची नावे आहेत. तिघेही त्यांच्या धर्मावर पूर्ण निष्ठेने विश्वास ठेवतात आणि दिवसातून पाच वेळा नमाज पठण करतात. काकांचा शेवटचा संस्कार करण्यात त्यांनी हिंदू संस्कृतीची पूर्ण काळजी घेतली.

याविषयी बोलताना जुबैरने सांगितले की , ‘भानुशंकर चाचा यांनी जीवनाच्या शेवटच्या क्षणी शेजारच्या हिंदू कुटुंबातून गंगेचे पाणी मागितले होते. काकांच्या निधनानंतर आम्ही आमच्या शेजार्‍यांना सांगितले की आम्हाला त्यांचा ब्राह्मणांसारखा अंत्यसंस्कार करायचा आहे. त्यावर आम्हाला शेजार्‍यांनी सांगितले की त्यांच्या पार्थिवाला खांदा देण्यासाठी जानवे घालावे लागेल. त्यानुसार आम्ही जानवे घातले. नसीरचा मुलगा अरमानने भानुशंकर यांच्या चितेला मुखाग्नी दिला होता. हिंदू संस्कृतीनुसार आम्ही 12 व्या दिवशी अरमानचे मुंडन करू. आम्ही त्यांना काका आणि आमची मुले आजोबा बोलायची, आमच्या बायका वडीलधारे म्हणून त्यांचे चरणस्पर्श करायच्या. भानुशंकर काका यांचे स्वत: चे कुटुंब नाही. बर्‍याच वर्षांपूर्वी त्यांचा अपघात झाला होता, त्यानंतर आमचे वडील त्यांना घरी घेऊन आले होते. तेव्हापासून ते आमच्याबरोबर राहायचे. ते आमच्या कुटुंबातील एक अविभाज्य घटक होते.’

तीन भावांचे वडील भिखू कुरेशी आणि भानुशंकर पांड्या या गेल्या 40 वर्षांपासून चांगले मित्र होते. तीन वर्षापूर्वी भिखू कुरेशी यांचे निधन झाले. तेव्हापासून भानुशंकर पांड्या एकटे आणि नाखूष राहत होते.

 

You might also like