‘औरंगजेब दुष्ट राजा होता, मुस्लीम समाजालाही त्याच्याविषयी प्रेम नाही’ : शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे

पोलिसनामा ऑनलाईन, मुंबई, दि. 17 जानेवारी : मागील काही दिवसांपासून औरंगाबाद नामांतराच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकारण तापले आहे. यातच औरंगजेब हा अत्यंत दुष्ट राजा होता. मुस्लीम समाजालाही त्याच्याविषयी प्रेम वाटत नाही, असे विधान शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केलंय. तसेच, औरंगाबादचे नामांतर हा अस्मितेचा प्रश्न आहे. औरंगाबादचे नामांतर झाल्यास आपली मुस्लीम मते जातील, हा गैरसमज काँग्रेस पक्षाने मनातून काढून टाकावा, असेही चंद्रकांत खैरे यांनी म्हटलंय.

दरम्यान, औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावर ’सामना’तून काँग्रेस पक्षावर निशाणा साधला होता. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी प्रसिद्धीपत्रक काढून ’रोखठोक’ प्रत्युत्तर दिलंय. नामांतराचे राजकारण कोणाला प्रिय? 5 वर्षे सत्तेत असलेलेच ढोंगीपणा करत आहेत? असे म्हणत बाळासाहेब थोरात यांनी शिवसेनेसोबत भाजपावरही निशाणा साधलाय.

या पार्श्वभूमीवर चंद्रकांत खैरे यांनी एका वृत्तवाहिनीशी चर्चा केली. यावेळी बाळासाहेब थोरात यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केलाय. बाळासाहेब थोरात हे माझे मित्र आहेत. त्यांना मी एवढेच सांगू इच्छितो की, औरंगजेब दुष्ट राजा होता. मुस्लीम समाजालाही त्याच्याविषयी प्रेम नाही. त्यामुळे औरंगाबादच्या नामांतरामुळे मुस्लीम व्होट बँकेला धक्का बसण्याची भीती काँग्रेसने बाळगू नये, असे खैरे म्हणाले.

यासह, बाळासाहेब थोरात यांनी ही गोष्ट फार मनाला लावून घेऊ नये. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजित पवार आणि बाळासाहेब थोरात एकत्र बसून या सगळ्यातून मार्ग काढतील. पण, औरंगाबादचे नामांतर होणार म्हणजे होणार, हे निश्चित आहे. आगामी काळामध्ये काँग्रेस नामांतराला विरोध करणार नाही, असा विश्वास मला वाटत असल्याचे खैरे यांनी सांगितले.

औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरुन सुरू असलेल्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेब थोरात यांनी एक प्रसिद्धीपत्रक ट्विट केलंय. औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्राच्या राजकारणात धुरळा उडत आहे. शिळ्या कढीला ऊत आणून काही मंडळी आपला स्वार्थ साधू इच्छित आहेत. काँग्रेसने आपली भूमिका यागोदरच स्पष्ट केल्यानंतर सल्ला देणार्‍यांची संख्या वाढतेय. मात्र, मागील 5 वर्ष एकमेकांसोबत सत्तेमध्ये असलेले आज नामांतराचे राजकारण करत आहेत. हा ढोंगीपणा नाहीतर काय आहे? केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये हे दोघेही मांडीला मांडी लावून सत्ता भोगत होते. तेव्हा यांना नामांतराचा मुद्दा आठवला नाही का?, अशी भूमिका थोरात यांनी मांडली आहे.

बाळासाहेब थोरात यांनी शिवसेनेला लक्ष्य करताना म्हटलंय, राज्यामध्ये आमचा सहकारी पक्ष असलेल्या शिवसेनेला आपल्या मतांची चिंता वाटते. त्यामुळेच त्यांनी हा नामांतराचा ’सामना’ सुरू केलाय. भाजपच्या बाबतीत बोलायचे झाले तर ढोंगीपणा हे त्यांचे स्वभाव वैशिष्ट्य आहे. त्यामुळे त्यांच्या वागण्या-बोलण्याकडे जनता करमणूक म्हणून पाहते, अशी शब्दांत टीका बाळासाहेब थोरात यांनी केलीय.