मुस्लिम समाजातील मुलींच्या लग्नाबाबत उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय; अल्पवयीन असाल तरीही…

नवी दिल्ली : मुलींसाठी लग्नाचे वय 18 पूर्ण तर मुलांसाठी 21 वर्षे पूर्ण असणे कायद्याने बंधनकारक आहे. जर त्यापेक्षा कमी वय असेल तर संबंधित विवाह बेकायदेशीर ठरवून कारवाई केली जाते. पण त्याच पार्श्वभूमीवर पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. त्यानुसार मुस्लिम समाजातील मुलगी सज्ञान नसली तरीही विवाह वैध असेल.

एका मुस्लिम जोडप्याने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने महत्वपूर्ण निकाल दिला आहे. ‘मुस्लिम पर्सनल लॉ’चा हवाला देत न्यायालयाने सांगितले, की जर मुस्लिम समाजातील मुलगी तरुण असेल पण सज्ञान नसेल तरीही तो विवाह वैध असेल. मोहालीतील निवासी असलेल्या एका जोडप्याने कुटुंबियांविरोधात जाऊन लग्न केले. या लग्नामुळे दोन्ही कुटुंब नाराज होते. यामध्ये तरुणाचे वय 36 वर्ष आहे तर मुलीचे वय 17 वर्ष आहे.

जानेवारी महिन्यात केलं लग्न

या दोघांनी जानेवारी महिन्यात लग्न केले होते. तेव्हापासून त्यांच्या जीवाला धोका असल्याचे सांगितले जात होते. लग्नानंतर दोघांनीही सुरक्षेसाठी मोहालीच्या विशेष पोलिस अधीक्षक (SSP) यांच्याकडे विनंतीही केली होती. मात्र, तरीही पोलिसांकडून कोणत्याही प्रकारे सुरक्षा दिली गेली नाही. त्यानंतर या दोघांनीही उच्च न्यायालयात धाव घेतली.

लग्नासाठी मुलगी सज्ञान असणे बंधनकारक नाही

या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने सांगितले, की मुस्लिम जोडपं असेल त्यातील मुलगी सज्ञान असणे बंधनकारक नाही. जर मुलगी तरूण असेल तर तिला अधिकार आहे, की तिच्या पुढील जीवनात सोबत कोण असावं. संविधानही तिला स्वातंत्र्यपूर्वक जगणे आणि मनासारखा जीवनसाथी निवडण्याचा अधिकार देते.