‘मुस्लिम लीग एक व्हायरस, काँग्रेसलाही झाली आहे त्याची लागण’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय लष्कराला मोदी सेना म्हटल्याचा वाद थंड होत ना होतो तोच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. मुस्लिम लीग एक व्हायरस आहे. काँग्रेसला या व्हायरसची लागण झाली आहे. योगी यांच्या अधिकृत अकाऊंटवरून याबाबत ट्विट करण्यात आले आहे.

आपल्या ट्विटमध्ये योगींनी मुस्लिम लीग आणि काँग्रेसवर निशाणा साधला आहे. आपल्या ट्विटमध्ये योगी आदित्यनाथ म्हणतात की, “मुस्लिम लीग एक व्हायरस आहे. एक असा व्हायरस आहे ज्याची लागण झाली यातून कोणी वाचू शकत नाही. आज तर विरोधी पक्ष काँग्रेसलाच याची लागण झाली आहे. जरा विचार करा, हे (काँग्रेस) जर जिंकले तर काय होईल ? हा व्हायरस पूर्ण देशात पसरेल.” असे वादग्रस्त ट्विट योगी आदित्यनाथ यांनी केले आहे.

यानंतर योगींनी आणखी एक ट्विट करत मुस्लिम लीगवर तोफ डागली आहे. योगी आदित्यनाथ आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये म्हणतात की, “1857 च्या स्वातंत्र्य लढ्यात मंगल पांडेला साथ देत पूर्ण देश इंग्रजांविरुद्ध लढला होता. त्यानंतर हा मुस्लिम लीगचा व्हायरस आला आणि पूर्ण देशात असा काही पसरला की, पूर्ण देशाचीच वाटणी झाली आणि देशात फूट पडली. आता आज पुन्हा एकदा तोच धोक दिसत आहे. हिरवे झेंडे पुन्हा फडकवले जात आहे. मुस्लिम लीग व्हायरसने काँग्रेस संक्रमित झाली आहे. त्यामुळे आपण सावध व्हा.” असे योगींनी म्हटले आहे.