मुस्लिम व्यक्तीनं हनुमान मंदिरासाठी दान केली चक्क कोट्यवधी रुपयांची जमीन

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   कर्नाटक राज्यातील बंगळुरूमध्ये धार्मिक एकात्मतेचं एक उत्तम उदाहरण पाहायला मिळालं आहे. एका मुस्लिम व्यक्तीने हनुमान मंदिराच्या पुनर्निर्माणासाठी आपली सुमारे एक कोटी रुपयांची जमीन दान केली आहे. एच. एम. जी. बाशा असे या दानशूर व्यक्तीचं नाव आहे. त्यांच्या या निर्णयाचं सर्वत्र कौतुक होत आहे.

हनुमान मंदिर छोटे होते. त्यामुळे पूजा-अर्चना करताना भाविकांची गर्दी होत असे. मात्र, आता लवकरच मुस्लिम व्यक्तीने दान केलेल्या जमिनीवर हनुमानाचं भव्य मंदिर उभारले जाणार आहे.

जमीन बंगळुरूच्या ओल्ड मद्रास रोडवर असून, ही अतिशय मोक्याची जागा आहे. सध्या या जमिनीची किंमत कोट्यवधी रुपयांत आहे. त्यामुळे बाशा यांच्या दानशूरपणाचं कौतुक होतंय. बाशा यांचं कौतुक करणारे होर्डिंग्स, पोस्टर, बॅनर मंदिर परिसरात आणि इतरत्र लावले आहेत. जमीन मिळाल्यानंतर श्री वीरांजनेयास्वामी देवालय सेवा ट्रस्टतर्फे मंदिराच्या विस्ताराचं काम सुरू केलं आहे.

65 वर्षांचे एचएमजी बाशा हे कार्गोचा व्यापार करतात. काडूगोडी भागात त्यांचं घर असून, बंगळुरूच्या मायलापुरा भागात त्यांची सुमारे 3 एकर जमीन आहे. या जमिनीजवळ हनुमानाचं एक मंदिर मागील अनेक वर्षांपासून आहे. हे मंदिर खूप प्राचीन आहे, असे लोकांचे म्हणणे आहे. त्यामुळे शेकडो भाविक या मंदिरात पूजेसाठी येत असतात. मात्र, भाविकांना छोट्या मंदिरामुळे गर्दीचा सामना करावा लागतो.

मंदिर समितीच्या म्हणण्यानुसार, मंदिराच्या पुनर्निर्माणासाठी योजना तयार केली होती. मात्र, समितीकडे पुरेशी जमीन नव्हती. मंदिराच्या जवळ जमिनी बाशा यांच्या मालकीची होती. बाशा यांना भाविकांची अडचण लक्षात आल्याने त्यांनी स्वमालकीची जमीन मंदिरासाठी दान करण्याची तयारी दर्शवली आहे. तसेच यासंदर्भात मंदिर समितीशीही चर्चा केली आहे, असे समजत आहे.