जातीभेदाच्या भिंती मोडत मुस्लीम कुटुंबात गणपती विराजमान

पोलीसनामा ऑनलाईन टीम – देशात हिंदू मुस्लीम ऐक्याच्या अनेक घटना आणि अनेक प्रसंग आजूबाजूला पाहायला मिळतात. असाच एक प्रसंग गणेश चतुर्थीला उस्मानाबादमधील कळंब इथे घडला आहे. एका चिमुकल्याच्या हट्टापायी एका मुस्लीमधर्मियांच्या घरात गणपती बाप्पा विराजमान झाले. अस्लम आणि अर्शिया जमादार या दाम्पत्याने आपल्या चिमुकल्याचा हट्ट पुरवला आणि घरात बाप्पाची प्रतिष्ठापना करीत पूजा केली .

फेसबुक पोस्टद्वारे अस्लम शेख यांनी हा संपूर्ण प्रसंग कथन केला आहे. त्यांच्या तीन वर्षांच्या चिमुकल्याने अब्रारने अम्मीकडे गणपती आणायचा हट्ट धरला होता. त्यानंतर काही वेळाने घरात बाप्पांचे आगमन झाल्याचा फोटोच अर्शिया यांनी अस्लम जमादार यांना पाठवला. घरात बाप्पा आल्याने अब्रार अतिशय खूश आहे. मागच्या वर्षी अब्रार शेजार्‍यांसोबत गणपती आणायला गेला होता. तेव्हापासूनच त्याला बाप्पाची ओढ लागली असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु शेजार्‍यांची बदली झाल्याने यंदा अब्रारला गणपती आणायला जाता आले नाही. मग त्याने बाप्पाला घरीच आणण्याचा हट्ट धरला होता. जातीधर्माच्या भिंती मोडून अस्लम आणि अर्शिया जमादार या दाम्पत्याने लेकराचा हट्ट पुरवत गणपती घरी आणला विधीवत त्याची प्राणप्रतिष्ठा करुन आरतीही केली.