home page top 1

औरंगाबादमध्ये तणाव : मुस्लीम तरुणाला ‘जय श्रीराम’ म्हणण्यास भाग पाडणाऱ्यांविरुद्ध FIR

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – कामावरून घरी जात असलेल्या एका मुस्लीम तरुणाला ८ ते १० जणांच्या टोळक्याने अडवून त्याला ‘जय श्रीराम’ म्हणण्यास भाग पाडले. याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरुद्ध बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार गुरुवारी (दि.१८) रात्री औरंगाबाद शहरातील हुडको कॉर्नर परिसरातील मुझफ्फरनगरमध्ये घडला.

इम्रान पटेल (वय-२८) याने बेगमपुरा पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. तरुणाची तक्रार दाखल करून घेतली असून तपास सुरु केला आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर तथ्य उघड होईल असे बेगमपुरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांनी सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, इम्रान पटेल हा एका हॉटेलमध्ये काम करतो. गुरुवारी रात्री बाराच्या सुमारास कामावरून घरी जात असताना हुडको कॉर्नर भागातील मुझफ्फरनगर मध्ये आल्यानंतर त्याला ८ ते १० तरुणांच्या टोळक्याने अडवले. टोळक्याने त्याच्या दुचाकीची चावी काढून घेत त्याला बेदम मारहाण केली. एवढ्यावरच ते टोळके थांबले नाही तर इम्रानला जबरदस्तीने ‘जय श्रीराम’ म्हणण्यास भाग पाडले. घाबरलेल्या इम्रानने तीन वेळा ‘जय श्रीराम’ म्हटले. त्यानंतर टोळक्याने त्याला मारहाण करत सोडून दिले.

दरम्यान, या ठिकाणाहून एक हिंदू दाम्पत्य जात होते. त्यांनी हा प्रकार बघितल्यानंतर इम्रानची सुटका केली. ही घटना शहरात वाऱ्यासारखी पसरल्यानंतर पोलिसांनी बेगमपुरा पोलीस ठाण्यात गर्दी केली. पोलीस ठाण्यात एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी गर्दी करून आरोपींवर कारवाईची मागणी केली. या घटनेमुळे औरंगाबाद शहरामध्ये तणावाचे वातावरण आहे.

आरोग्यविषयक वृत्त

Loading...
You might also like