‘त्या’ हिंदू महिलेचे प्राण वाचवण्यासाठी मुस्लिम युवकाने तोडला चक्क रमजानचा ‘रोजा’

सोनितपूर : वृत्तसंस्था – आजच्या जगात एकमेकांचा जीव घ्यायला देखील मागेपुढे न बघणारे लोक आहेत. हिंदू -मुस्लिम धर्माच्या नावाखाली दंगे घडवून तेढ निर्माण करणारे देखील या जगात कमी नाहीत. मात्र आसाममधील एक घटना हिंदू-मुस्लिम ऐक्याचं मोठं उदाहरण म्हणून समोर आलं आहे. एका मुस्लिम तरुणाने एका हिंदू महिलेचे प्राण वाचविण्यासाठी रमजान चालू असताना रोजा तोडून आपले रक्तदान करून या ८५ वर्षीय वृद्ध महिलेचे प्राण वाचवले. यामुळे या तरुणाचे सर्व स्तरातून कौतुक होताना दिसून येत आहे. सोशल मीडियात देखील त्याच्यावर कौतुकाचा मोठ्या प्रमाणात वर्षाव होताना दिसून येत आहे.

मुन्ना अन्सारी असे त्या तरुणाचे नाव असून तो आसाममधील सोनितपूर येथील रहिवाशी आहे. रमजाननिमित्त सूर्योदय ते सूर्यास्त तो रोजा ठेवतो. इस्लाम धर्मात रोजा पाळण्याचे कडक नियम आहेत. मात्र रोजादरम्यान मुन्ना अन्सारी यांना विश्वनाथ सामान्य रुग्णालयातून एका कॉल आला आणि त्यांनी रोजा तोडण्याचा निर्णय घेतला. येथील रहिवाशी रेवती बोरा यांना एका आठवड्यापूर्वी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. दरम्यान या महिलेला बी निगेटिव्ह या रक्ताची गरज होती. सर्व ठिकाणी आणि नातेवाईकांकडे चौकशी करून देखील त्यांना रक्त उपलब्ध होत नव्हते. त्यामुळे रुग्णालयाने मुन्ना अंसारीला फोन करून तत्काळ बी निगेटिव्ह या रक्तगटाची आवश्यकता असल्याचे सांगितले आणि मुन्ना यांनी देखील कोणताही वेळ न लावता तत्काळ रग्णालयात धाव घेतली.

त्यांनी रक्तदान केल्याने त्या महिलेचे प्राण वाचले. रेवती बोरा यांचा मुलगा अनिल बोरा यांनी भावुक होत मुन्ना अन्सारी यांचे आभार मानले तसेच माणुसकी अजूनही माणसात जिवंत असल्याचे म्हटले. बी निगेटिव्ह हा रक्तगट खूप कमी लोकांकडे असतो, त्यामुळे मुन्ना अन्सारी यांच्यामुळे एका महिलेचे प्राण वाचले.