राज्यातील सर्व जाती-धर्माच्या नागरिकांचे हक्क सुरक्षित : CM ठाकरे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील कोणत्याही जाती-धर्माच्या नागरिकांच्या हक्काला शासन धक्का लागू देणार नसल्याचे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. सुधारित नागरिकत्वाच्या मुद्यावरून मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने आज (सोमवार) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मंत्रालयात भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिष्टमंडळाला आश्वासन दिले.

यावेळी गृहमंत्री एकनाथ शिंदे, आमदार अमीन पटेल, अब्दुल सत्तार, समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी, राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांच्यासह मुस्लीम समजातील धर्मगुरु उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत नागरिकांनी कोणताही गैरसमज मनात बाळगू नये. राज्यातील कोणत्याही जाती-धर्माच्या नागरिकांच्या हक्काला शासन धक्का लागू देणार नाही असे आश्वासन त्यांनी शिष्टमंडळाला दिले. तसेच राज्यात शांततेचे वातावरण कायम ठेवण्याचे आवाहनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले.

सुधारीत नागरिकत्व कायद्याच्या आधारे केंद्रातील भाजप सरकार धर्मिक फूट पाडत असल्याचा आरोप कायदाविरोधी आंदोलकांनी केला आहे. एनआरसी प्रक्रियेमुळे दशातील गरिबांना कागदपत्रांअभावी आपले नागरिकत्व सिद्ध करण्यात अडचणी निर्माण होणार असल्याचे आंदोलकांनी म्हटले आहे. सुधारित नागरिकत्व कायदा हा धर्माच्या आधारे नागरिकत्व देणार असल्यामुळे संविधानाच्या मूल्यांची पायमल्ली होत असल्याचाही आरोप करण्यात येत आहे.

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/