माणुसकीला सलाम ! मुस्लीम व्यक्तींकडून शीख कामगारावर अंत्यसंस्कार

पोलिसनामा ऑनलाईन – कोरोनामुळे लॉकडाऊन कालावधीत हातावर पोट असणार्‍या मजुरांना कष्ट सोसावे लागत आहेत. याकाळात अनेक लोक जात-पात, धर्म-पंथ विसरुन एकमेकांना मदत करताना दिसत आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये सुतारकाम करणार्‍या पंजाबमधील एका शीख मजुरावर स्थानिक मुस्लीम व्यक्तींनी अंत्यसंस्कार करत माणुसकीचे दर्शन घडवले आहे. रणवीर सिंह असे मृत कामगाराचे नाव असून तो गंडर्बल जिल्ह्यातील वाकुरा गावात सुतारकाम करत होता.

खोली भाडोत्राी घेउन रणवीर काही कामगारांसह गावात राहत होता. त्याच्या मृत्यूची बातमी साथीदार व स्थानिक गावकर्‍यांनी पोलीस व प्रशासनाला कळवली होती. स्थानीक लोकांनी यावेळी एकत्रा येउन रणवीर सिंह याच्यावर अंत्यसंस्कार केले. यासाठी लागणारा खर्चही त्यांनीच उभा केला. माणुसकीच्या नात्यातून रणवीर सिंहच्या पत्नीच्या बँक खात्यात स्थानिकांनी काही रक्कम जमा केली आहे. लॉकडाउन काळात रणवीरचे पार्थिव पंजाबला नेणे शक्य नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. स्थानिक तहसीलदार गुलाम मोहम्मद भट यांनी ही माहिती दिली.

माणूस कोणत्याही जाती-धर्माचा असो संकटकाळात त्याची मदत करणे हे कर्तव्य असल्याची भावना गावकरी अब्दुल रेहमान यांनी बोलून दाखवली. वाकुरा गावात अनेक परप्रांतीय मजुर कामासाठी येत असतात. त्यामुळे शक्य होईल तशी मदत इथले स्थानिक या मजुरांना करत असतात. काही कामगार तर आमच्या परिवाराचा भाग होतात. रणवीरच्या मृत्यूची बातमी समजताच याच भावनेतून गावकर्‍यांनी त्याच्यावर अंत्यसंस्कार केल्याचे रेहमान यांनी सांगितले आहे.