रामजन्मभूमी वाद ! देशात कायम शांतता नांदावी यासाठी मुस्लिमांनी जमीन हिंदू बांधवांना द्यावी : कुलगुरु जमीरउद्दीन शाह

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अयोध्या रामजन्मभूमी – बाबरी मशीद जमीन वादा प्रकरण सर्वोच्च न्यायालयाधीन आहे. यावर लवकरच अंतिम निकाल समोर येण्याची शक्यता आहे. परंतू या दरम्यान सेवानिवृत्त लेफ्टनंट जनरल आणि अलीगढ मुस्लीम विद्यापीठाचे माजी कुलगुरु जमीर उद्दीन शाह यांनी मुस्लिम समुदायाला एक आवाहन केले आहे की देशात कायम शांतता नांदावी यासाठी मुस्लिमांनी अयोध्येतील जमीन हिंदू बांधवांना देऊन टाकावी.

अयोध्येप्रकरणी सौहार्दपूर्ण समेटाने पडताळणी करुन पाहण्यासाठी मध्यस्थांची समिती नेमण्यात आली. या समितीने 6 मेला आपला आहवाल सर्वोच्च न्यायालयाकडे सुपूर्द केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने 8 मार्चला हे प्रकरण मध्यस्थीसाठी समितीकडे देण्याचा आदेश देण्यात आला होता. या समितीचे अध्यक्ष निवृत्त न्यायाधीश एफ एम कलिफुल्ल असून या समितीत अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर, तसेच ज्येष्ठ वकील श्रीराम पांचू हे दोन सदस्य आहेत. परंतू योग्य तो परिणाम न आल्याने न्यायालयात ही सुनावणी सुरु करण्यात आली.

या वादावर आता निवृत्त लेफ्टनंट जनरल आणि अलीगढ मुस्लिम विद्यापीठाचे कुलगुरु जमीर शाह यांनी वक्तव्य केले. ते म्हणाले की सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट निकाल द्यायला हवा. तो पंचायतीसारखा निकाल नसावा. याबरोबरच सर्वोच्च न्यायालयाने मुस्लिमांच्या बाजूने निकाल दिला, तर तिथे मशिद बांधणे शक्य आहे का? तर नाही. त्यामुळे मुस्लिमांच्या बाजूने जरी निकाल आला, तरी देशातील शांततेसाठी मुस्लीम बांधवांनी ही जमीन हिंदू बांधवांना देऊन टाकली पाहिजे. हाच एक मार्ग आहे, अन्यथा आपण लढत राहू. न्यायालयाच्या बाहेर या वादावर समेट घडवून आणण्यासाठी माझा पाठिंबा आहे.

मुस्लीम फॉर पीस या संस्थेचे समन्वयक कमाल खान यांनी या वादावर भूमिका मांडली की, वादग्रस्त जमीन ही भारतीय मुस्लिमांची आहे. परंतू, सामाजिक सौहार्दता आणि देशातील शाश्वत शांततेसाठी ही जमीन सरकारकडे सदिच्छा म्हणून सुपूर्द करायला हवी. त्यांच्या याच विधानावर जमीर उद्दीन शाह यांनी आपले मत व्यक्त केले.

जमीर शाह म्हणाले की समाजवाद, लोकशाही यांच्या लवचिकता आणि शतकांपासून हिंदू बांधवांबरोबर असलेले नाते लक्षात घेता वादग्रस्त जमीन सर्वोच्च न्यायालयाने भारत सरकारकडे सुपूर्द करावी. ते पुढे म्हणाले की सामाजिक सलोखा आणि शांतता टिकवण्यासाठी हे केले पाहिजे.

 

visit : Policenama.com