काय सांगता ! होय, PM मोदींच्या आरतीनंतर आता बांधणार मंदिर, BJP आमदाराची घोषणा

नवी दिल्ली : पोलिसनामा ऑनलाइन – उत्तराखंड मधील भाजपाचे आमदार गणेश जोशी यांनी रविवारी ‘श्री मोदी जी की आरती’ चे प्रकाशन केलं. यावेळी बोलताना जोशी यांनी लॉकडाऊन संपल्यावर आपण मोदींचे मोठे मंदिर बांधणार असून त्यामध्ये मोदींची मोठी मूर्ती असेल अशी घोषणा केली आहे. जोशी हे मसुरी मतदारसंघाचे आमदार आहेत.

जोशी म्हणाले, ‘माझ्या मनात पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या बद्दल प्रचंड आदर आहे. ते केवळ राष्ट्रीय नेते नसून आंतराष्ट्रीय नेते आहेत. त्यांचे नेतृत्व पाहून अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प यांनाही आश्चर्य वाटले. त्यांची आरती प्रकाशित करून मी काहीही चूक केलेली नाही. हा लॉकडाऊन संपल्यानंतर मी मोदींची मूर्ती असणारे एक मंदिर उभारणार असल्याची घोषणा जोशी यांनी केली. तसेच मंदिर उभारणे हे काही चुकीचे नाही. अनेक लोकांनी सोनिया गांधी आणि रजनीकांत यांचं देखील मंदिर बांधलं आहे. कारण लोकांचं त्यांच्यावर प्रेम आहे आणि ते त्यांचा सन्मान करतात असं मत जोशी यांनी व्यक्त केलं.

मोदींकडे दैवी शक्ती आहे

पंतप्रधान मोदींचे कौतुक करताना, “ते दिवसातून १८ तास काम करतात. यावरुनच अंदाज येतो की त्यांच्याकडे कोणती तरी दैवी शक्ती आहे. त्यांच्या प्रति आदर व्यक्त करण्याच्या भावनेमधूनच मी मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला आहे”. तसेच “माझ्या घरातील देवघरामध्ये देवांच्या बाजूला मी त्यांचा फोटो ठेवला आहे. देवांची पूजा केल्यानंतर मी त्यांच्याप्रती आदर व्यक्त करतो. १९९९ पासून म्हणजेच ते एक सामान्य कार्यकर्ता होते तेव्हापासून मी त्यांच्या फोटो माझ्या कार्यालयामध्ये ठेवला आहे”. असंही जोशी आपल्या भाषणात म्हणाले.

काँग्रेसकडून टीका

काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते गरिमा दसौनी यांनी जोशी यांच्यावरती टीका केली आहे. उत्तराखंड राज्यमंत्री धनसिंग रावत आणि गणेश जोशी यांच्या या कृत्या मुळे संपूर्ण हिंदू सनातन धर्माचा अपमान केला आहे. मोदी एका माणूस आहेत त्यांना देव-देवतांच्या जागी स्थान दिले जाऊ शकत नाही. तसेच मोदींची स्तुती करताना आरतीमध्ये वापरलेले शब्द त्यांचे देव म्हणून वर्णन करतात असा आरोप त्यांनी केला. जे लोक काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप करीत होते ते आज एका व्यक्तीपुरते मर्यादित झाले आहेत आणि त्यांच्या पादुका पूजेसाठी कोणत्याही पातळीवर येऊ शकतात. असं त्यांनी म्हटलं.

गरिमा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री त्रिवेंद्र राव यांच्याकडे या प्रकरणाची दखल घेत या दोघांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची मागणी केली आहे. त्याचसोबत कारवाईच्या मागणीसाठी युवक काँग्रेसच्या वतीने काँग्रेस भवनात निदर्शने करण्यात आली.