Must Read : 1 मे पासून बदलतील ATM, बँक, SBI, इनकम टॅक्ससह ‘हे’ मोठे नियम, थेट तुमच्या खिशावर ‘परिणाम’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लॉकडाऊनमुळे संपूर्ण देशातील कामकाज ठप्प झाले आहे. कोरोना विषाणूमुळे आपल्या जीवनशैलीत बदल घडून आला आहे. आपल्या कामकाज करण्याच्या पद्धतीमध्ये बदल झाला आहे. बरेच लोक घरून काम करत आहेत. लोकांच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत आपण कसे अधिक बचत करू शकतो आणि कोणताही दंड कसा टाळता येईल हे जाणून घेणे अधिक महत्वाचे आहे. यासाठी नियमांमध्ये होणाऱ्या बदलांविषयी माहिती असणे आवश्यक आहे.

दरम्यान 1 मे पासून काही नवीन नियम लागू होत आहेत आणि बरेच नियम बदलत आहेत. एटीएम, बँकिंग, एसबीआय, पीएनबी, आयकर यासह अनेक नियम आजपासून बदलत आहेत. लॉकडाऊनमुळे रेल्वे आणि हवाई सेवा विस्कळीत झाल्या असल्या तरी यासंबंधित नियमही बदलण्यात आले आहेत. 1 मे पासून कोणते नियम बदलत आहेत आणि त्याचा काय परिणाम होईल ते जाणून घेऊया.

1 मे पासून एसबीआय (SBI) चे व्याज दर बदलतील

1 मे पासून स्टेट बँक ऑफ इंडियाचे व्याज दर बदलत आहेत. 1 मे पासून एक लाखाहून अधिक बचत ठेवींवरील व्याज दर कमी करण्यात येत आहे. त्याचबरोबर नवीन कर्जदारांना आता पूर्वीपेक्षा कमी दराने कर्ज मिळेल. एप्रिल महिन्यात आरबीआयने रेपो दरात कपात केली, त्यामुळे बचत ठेवींचा व्याज दर बदलला आहे. एसबीआय ही पहिली बँक आहे, जिने बाह्य बेंचमार्क नियम लागू करून रेपो रेटसह बचत ठेव आणि अल्प मुदतीच्या कर्जाचे दर लागू केले आहेत.

पीएनबी (PNB) खातेधारकांसाठी हे नियम बदलले

त्याच बरोबर, आजपासून पंजाब नॅशनल बँक खातेदारांसाठी एक मोठा नियम बदलला आहे. पीएनबीने 1 मेपासून आपले डिजिटल वॉलेट बंद केले आहे. पीएनबीची पेमेंट वॉलेट सर्व्हिस पीएनबी किट्टी वॉलेट 1 मे पासून बंद करण्यात आली आहे. ते फक्त 30 एप्रिलपर्यंत खातेदारांसाठी खुले ठेवले होते. मध्यरात्रीनंतर ते बंद करण्यात आले. पीएनबीच्या या किट्टी वॉलेट खातेधारकांना डिजिटल पेमेंटची सुविधा मिळत होती. बँकेने डिसेंबर 2016 मध्ये ही सेवा सुरू केली होती.

एटीएम (ATM) शी संबंधित नियमांमध्ये बदल

लॉकडाऊन आणि कोरोना संकटाच्या दरम्यान स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले जात आहे. एटीएमसाठी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नवीन नियम तयार केले गेले आहेत. नव्या नियमानुसार एटीएमच्या प्रत्येक वापरानंतर ते संक्रमणमुक्त करण्यासाठी त्यास स्वच्छ केले जाईल. याची सुरुवात गाझियाबाद व चेन्नई येथून झाली आहे. याचा अवलंब न केल्यास एटीएम चेंबर सीलबंद करण्यात येईल.

बोर्डींग स्टेशन बदलण्याची सूट

लॉकडाऊनमुळे गाड्या बंद असल्या तरी आजपासून रेल्वेचा मोठा नियम बदलण्यात आला आहे. सेवा पुनर्संचयित होताच हा नियम लागू होईल. नव्या नियमानुसार 1 मे पासून रेल्वेमध्ये प्रवास करणारे प्रवासी आरक्षण चार्ट सुटण्यापूर्वी 4 तासांपर्यंत बोर्डिंग स्टेशन बदलू शकतात. सध्या रेल्वेच्या नियमांनुसार, प्रवासी प्रवासाच्या तारखेच्या 24 तास आधी आपले बोर्डिंग स्टेशन बदलू शकत होता, परंतु आता ते 4 तासांपूर्वी केले जाऊ शकते.

विमान कंपन्यांसाठी नियम बदलले

1 मे पासून एअर इंडियाच्या सर्व प्रवाशांना तिकीट रद्द केल्यावर कोणताही अतिरिक्त शुल्क भरावा लागणार नाही. कंपनीने 1 मे पासून प्रवास करण्याच्या 24 तास अगोदर तिकीट रद्द करणे किंवा बदलल्यास आकारण्यात येणारे कॅन्सलेशन शुल्क रद्द केले आहे.

मेट्रोमध्ये प्रवेश करण्याचे नियम बदलले

कोरोना विषाणूमुळे देशभरात मेट्रोमध्ये प्रवेश करण्याचे नियम बदलण्यात आले आहेत. नवीन नियमांतर्गत लोकांना केवळ कॉन्टॅक्टलेस स्मार्ट कार्डद्वारे प्रवास करण्याची परवानगी दिली जाऊ शकते. टोकन सिस्टम बंद होईल. प्रवासादरम्यान मास्क आणि आरोग्य सेतु अ‍ॅप मोबाईल मध्ये असणे अनिवार्य असेल. सामाजिक अंतर पाळणे बंधनकारक असेल. विना स्क्रीनिंग मेट्रो मध्ये प्रवेश मिळणार नाही.