Coronavirus : कोरोना रुग्णवाढीमुळे मोदी सरकारने महाराष्ट्रावर ओढले ताशेरे, म्हणाले – ‘नवा व्हायरस नव्हे तर तुम्हीच जबाबदार’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशातील सर्वाधिक नवे आणि ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आहेत. त्यातच राज्यात कोरोनाचा नवा स्ट्रेनही आढळला आहे. यामुळेच तर राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत नाही ना असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र केंद्राने याचे कारण सांगितले आहे. यासाठी नवा व्हायरस नव्हे तर तुम्हीच जबाबदार आहात असे म्हणत केंद्र सरकारने महाराष्ट्रावर ताशेरे ओढले आहेत.

देशात सध्या 1,89,226 ॲक्टिव्ह कोरोना केसेस आहेत. केरळमध्ये ॲक्टिव केसेस कमी होताना महाराष्ट्रात मात्र हे प्रमाण दुपटीने वाढले आहे. महाराष्ट्रात एक लाखांपेक्षा अधिक ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. देशातील सर्वाधिक ॲक्टिव्ह केसेस असलेल्या 10 जिल्ह्यांपैकी 8 जिल्हे फक्त महाराष्ट्रातच आहेत. ICMR चे महासंचालक डॉ. बलराम भार्गव म्हणाले, महाराष्ट्राची परिस्थिती खूप वाईट झाली असून हा कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा परिणाम नाही. तर कमी प्रमाणात चाचण्या, कोरोना नियमांचे उल्लंघन, बेजबाबदारपणा हेच कारणीभूत आहे. तर नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल म्हणाले, महाराष्ट्रातील कोरोनाच्या वाढत्या नव्या प्रकरणांमुळे आता चिंता वाढली आहे. ही खूप गंभीर परिस्थिती आहे. आपल्याला यातून दोन गोष्टी शिकल्या पाहिजेत. एक म्हणजे व्हायरसबाबत बेजबाबदार राहू नका आणि दुसरे म्हणजे जर आपल्याला कोरोनामुक्त राहायचे असेल तर कोरोना नियमांचे पालन करावेच लागेल. दरम्यान देशात दिवसभरात एकूण 22,854 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी सर्वाधिक 13,659 प्रकरण महाराष्ट्रात आहेत. त्यापाठोपाठ केरळात 2,475 आणि पंजाबमध्ये 1,393 असल्याचे समोर आले आहे.