‘EMI’ थकल्याने ‘मुथुट’ फायनान्सची ‘वसुली’ करणाऱ्या महिलांकडून शिवीगाळ, बायकोला पाठव म्हणून दिली धमकी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – फायनान्स कंपन्या अगोदर कर्ज घेण्यासाठी मागे लागतात. त्यावर अनेक छुपी कारणे दाखवून कर्जदाराला लुटतात. त्यात त्याचा एखादा हप्ता थकला तर वसुलीसाठी नेमलेल्या महिला कर्जदाराची लायकी काढत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करुन बघून घेण्याची धमकी देतात. वर तुला पैसे देण्यास जमत नसेल तर बायकोला पाठव अशी संतापजनक विधानेही त्यात करतात. असा अनुभव अनेकांना यापूर्वी आला आहे.

पुण्यातील नागरिक प्रभाकर कुतवळ यांना मुथुट होमफिन या कंपनीने नेमलेल्या थर्ड पार्टी वसुली महिलांकडून हा अनुभव आला आहे. त्यांनी याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांकडे तक्रार केली मात्र, त्यांनी केवळ अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद घेऊन त्यांना वाटेला लावले आहे.

कुतवळ यांनी भारती विद्यापीठ पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांनी वाकडेवाडी येथील मुथुट फायनान्स कंपनीतून २ वर्षांपूर्वी १४ लाख रुपये कर्ज घेतले आहे. आतापर्यंत ते नियमितपणे कर्जाचे हप्ते वेळेवर भरत होते. सप्टेंबर महिन्याचा त्यांचा हप्ता थकला होता. त्यांना फायनान्स कंपनीतून फोन करुन तेथील महिलांनी वाईट वाईट शिवीगाळ केली़ व तुझ्याकडे बघुनच घेतो अशी धमकी त्यांना दिली.

त्यांना आलेल्या फोनवरुन झालेल्या संभाषणातून त्यांचा १० सप्टेंबरचा हप्ता थकल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर हप्ता का भरला नाही़ अशी विचारणा केल्यावर ते माझा चेक मिळाला नाही. सोमवारपर्यंत चेक मिळाला की हप्ता भरतो. त्यावर कंपनीतून बोलणारी महिला त्यांना अर्वाच्य भाषेत झापायला सुरुवात करते.

तुम्ही महिन्याभर झोपले होते का?
लायकी आहे का तुमची
असे म्हटल्यावर कुतवळ हे नीट बोला असे म्हणतात़
त्यावर ही महिला तुम्ही कोण लागून गेले.
आम्ही जहागिरदार आहोत, म्हणूनच तुम्हाला लोन देतो़ लायकी नाही म्हणून भीक मागायला कशाला येतात.
खिशात पैसे नाही तर घर कशाला घेता़
आम्हाला पैसे कसे वसुल करायचे माहिती आहे. तुमच्या गॅरेंटरला पहा आता कसे करतो. कंपनी लोन देते ना तसे वसुलही करते.
त्यानंतर तर त्या महिलेने कहरच केला.
तुझ्या बायकोला पाठव असे म्हणून त्यांना मानहानीकारक धमकी दिली.
हे सर्व त्यांनी पोलिसांना दिले आहे.
शहरात या फायनान्स कंपन्यांनी धुमाकुळ घातला आहे. वसुलीसाठी त्यांनी गुंड पाळले आहेत. मात्र, शहर पोलीस दलातील अधिकारी डोळ्यावर कातडे पांघरुन हा राजरोजपणे सामान्यांचा चाललेला छळवाद निमूटपणे पहात आहेत़

visit : policenama.com