संतापजनक ! सूनेची गळफास घेऊन आत्महत्या, सासरच्या लोकांनी काढला व्हिडीओ

पोलीसनामा ऑनलाइन टीम – सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरात पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरपूर मधील दतियाना गावात ही घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ती आत्महत्या करताना तिच्या सासरच्यांनी तिला वाचवण्याऐवजी खोलीच्या बाहेरून आत्महत्येचा व्हिडीओ करून तो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी सासरच्या मंडळीवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

कोमल असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पलडी गावात राहणाऱ्या कोमलचे 2 वर्षापूर्वी दतियाना गावात राहणाऱ्या आशिषसोबत लग्न झाले होते. कोमलच्या माहेरच्यांनी आरोप केला आहे की, लग्न झाल्यापासूनच तिच्या सासरचे लोक तिच्याकडे हुंड्याची मागणी करत होते. तसेच तिला हुंड्यासाठी वारंवार मारहाणही करत होते. त्या त्रासाला कंटाळून कोमलने आत्महत्या केली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचानामा करून पोस्टमार्टमसाठी पाठवला. दुसरीकडे मृत महिलेच्या नातेवाईकांनी सासरच्या लोकांवर हुंडा आणि हत्येचा आरोप लावत तशी लिखित तक्रार पोलिसात दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.