दारू विक्रेती निघाली महिला सरपंच, घरांना बनवले होते गोडाऊन

मुजफ्फरपुर : बिहारच्या मुजफ्फरपुर जिल्ह्यात दारूच्या अवैध धंद्याबाबत एक खळबळजनक हकीकत समोर आली आहे. जिल्ह्यातील करजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अशा महिला सरपंचाला पकडले आहे जी आपल्या सरपंचपदाच्या आडून दारूचा धंदा करत होती. अटक करण्यात आलेल्या महिला सरपंचाच्या विविध ठिकाणांवरून 80 बॉक्स विदेशी मद्य जप्त करण्यात आले. एवढेच नव्हे, महिला सरपंचाच्या घरातून पोलिसांनी 7 लाख 19 हजार रुपयांची रोखड सुद्धा जप्त केली आहे, जी दारूधंद्यातील काळी कमाई असल्याचे सांगितले जात आहे.

हे प्रकरण करजा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बडकागाव उत्तर पंचायतीचे आहे आणि अटक महिला सरपंचाचे नाव सविता देवी आहे. माहितीनुसार, सरपंचाचा पती उमेश साहनीचा जुना गुन्हेगारी रेकॉर्ड आहे. सरपंच पती उमेश साहनी दारूच्या धंद्यासह इतर गुन्हेगारी कृत्य करत होता. आरोप आहे की सरपंच सविता देवी आपल्या पतीला रोखण्याऐवजी त्याच्यासोबत धंद्यात सहभागी झाली आणि आपल्या पतीला दारूच्या धंद्यात मदत करत होती.

रविवारच्या रात्री सरैया एसडीपीओ राजेश शर्मा यांना माहिती मिळाली की, बडकागावत दारूचा मोठा साठा पोहचला आहे. करजा पोलीस ठाणे, सरैया पोलीस ठाणे आणि स्पेशल टास्क फोर्सची टीम गठित करण्यात आली. या टीमने बडकागावात जेव्हा छापेमारी केली तेव्हा हकीकत जाणून सर्वजण हैराण झाले, कारण ज्या सविता देवीवर समाजाला न्याय देण्याची आणि विकास करण्याची जबाबदारी सोपवली होती, ती दारूचा धंदा करत होती.

धाडीनंतर सविता देवीचा पती फरार झाला होता. परंतु नंतर पोलिसांनी त्याला अटक केली. सरपंच आपल्या आजूबाजूच्या अनेक घरात दारू ठेवत होती आणि सर्वांचे धंद्यात सहकार्य घेत होती. करजा पोलीस ठाण्याचे प्रमुख सरोज कुमार यांच्या वतीने सविता देवीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, ज्यामध्ये अन्य चार लोकांना सुद्धा आरोपी करण्यात आले आहे.

या सर्वांच्या घरातून पोलिसांनी दारूच्या बाटल्या जप्त केल्या आहेत, ज्या सरपंचाने लपवून ठेवल्या होत्या. या प्रकरणात एसएसपी जयंत कांत यांनी म्हटले की, सविता देवी आणि उमेश साहनी यांच्या संपत्तीची सुद्धा चौकशी केली जाईल. पोलीस हा शोध घेत आहेत की, दारूतून या लोकांनी किती संपत्ती मिळवली आहे. तपासात जे समोर येईल त्यानुसार आवश्यकता पडल्यास त्यांची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल.