छळाचे सर्व आरोप खोटे, माझ्या सुनेचे विवाहबाह्य संबंध, राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाणांनी सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या, आमदार विद्या चव्हाण यांच्याविरुद्ध सूनेचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र सुनेने केलेला आरोप विद्या चव्हाण यांनी फेटाळून लावला आहे. ‘माझ्या सुनेचे विवाहबाह्य संबंध आहेत. हे कळल्यानंतर माझ्या मुलानं घटस्फोट घेण्याची तयारी सुरू करताच सुनेनं आरोप केले आहेत. कुणाच्या तरी चुकीच्या सल्ल्यामुळं ती असं वागत असून न्यायालयात खरंखोटं सिद्ध होईल,’ असं चव्हाण यांनी म्हटले आहे. त्यांच्यावर आणि त्यांच्या इतर कुटुंबियांवर लावण्यात आलेले सर्व आरोप खोटे असल्याचे आमदार विद्या चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

तिचे विवाहबाह्य संबंध

यावेळी बोलताना चव्हाण म्हणाल्या, ‘१० डिसेंबर रोजी माझा मुलगा कामानिमित्तानं डेन्मार्कला कंपनीच्या ट्रेनिंगसाठी जाणार होता. त्याच्या काही दिवस आधी त्याला सुनेच्या मोबाइलवर काही आक्षेपार्ह मेसेज आढळले. तिचे विवाहबाह्य संबंध असल्याचं त्यातून समोर आलं. त्याला धक्का बसला. त्यानं त्याबाबत आम्हाला सांगितलं. नंतर गौरीशी (माझ्या सुनेशी) बोलून वेगळं होण्याचा त्याने निर्णय सांगितला. आपल्या सगळ्या गोष्टी उघड झाल्याचं लक्षात येताच तिनं वकिलांचा सल्ला घेतला आणि आरोप सुरू केले. तिनं आमच्याविरोधात ३ कोटींचा दावाही केलाय. अर्थात, ती खोटं बोलते आहे हे यथावकाश समोर येईल. प्रकरण न्यायालयात असल्यानं मी त्यावर अधिक बोलू शकत नाही.’

…असे आमच्या घरात होणे शक्यच नाही

‘गेली अनेक वर्षे मी महिलांसाठी काम करते. मुलगा-मुलगी असा भेद आमच्या घरात होणं शक्यच नाही. माझ्या दोन्ही सुनांना मी मुलींसारखंच वागवलंय. त्यामुळं मुलासाठी छळ होतोय हे आरोप निराधार आहेत. गौरीला पहिली मुलगी झाली तेव्हाही आम्हाला आनंद झाला होता आणि दुसऱ्या मुलीच्या जन्माचाही आनंदच आहे. वकिलाच्या किंवा अन्य कुणाच्या तरी चुकीच्या सल्ल्यामुळं ती तसं वागतेय. खरंतर माझा मुलगा आणि सून दोघेही सज्ञान आहेत. त्यांना पाच वर्षांची मुलगी आहे. पुढं काय करायचं तो त्यांचा निर्णय आहे. नवरा-बायकोच्या वादात मला विनाकारण ओढण्यात आलंय, असंही त्यांनी सांगितलं.

‘गौरीशी माझं याबद्दल काहीही बोलणं झालेलं नाही. पण तिच्या आई-वडिलांना मी पत्र लिहिणार आहे. आपले चांगले संबंध असताना असं का व्हावं, अशी विचारणा त्यांना करणार आहे,’ असंही चव्हाण यांनी सांगितलं.

नक्की काय आहे प्रकरण ?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधान परिषद सदस्या विद्या चव्हाण यांच्याविरुद्ध सूनेचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्या चव्हाण यांच्यासह त्यांचे पती अभिजीत, मुलगा अजित (पीडितेचा नवरा) दुसरा मुलगा आनंद (पीडितेचा दीर) आणि शीतल (आनंद यांची पत्नी) अशा एकूण पाच जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पीडितेच्या तक्रारीनुसार, दुसऱ्यांदाही मुलगीच झाल्याने तिचा छळ करण्यात येत होता. विद्या चव्हाण आणि कुटुंबीयांविरुद्ध १६ जानेवारी रोजी सूनेने छळाची तक्रार दिली होती. सूनेचा छळ केल्याप्रकरणी पोलिसांनी भादंवि कलम ४९८ अ, ३५४, ३२३, ५०४, ५०६ आणि ३६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.