‘माझे वीज बिल, मलाच झटका…’; महावितरणच्या ‘त्या’ निर्णयावरुन भाजपा आक्रमक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यात डिसेंबर 2020 अखेर महावितरणची एकूण 63 हजार 70 कोटी रुपयांची थकबाकी असल्याने महावितरणची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. आता जर ग्राहकांनी वीज बिल भरले नाही तर वीज पुरवठा खंडित करण्याशिवाय पर्याय नाही, असे महावितरणने जाहीर केले आहे. महावितरणच्या या धोरणावर भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी टीका करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. वीज कनेक्शन खंडीत करण्याचा निर्णय म्हणजे सरकारची नवी गाथा आहे. मुळात अव्वाच्या सव्वा वीज बिल आली त्यात सवलती देण्याच्या घोषणा झाली, पण बिल्डर, कंत्राटदारांसाठी तातडीने काम करणाऱ्या राज्य सरकारने सामान्यांच्या तोंडी पाने पुसली, अशी टीका उपाध्ये यांनी केली आहे.

लॉकडाऊन काळात अव्वाच्या सव्वा वीजबिल आकारल्यामुळे जनतेत आक्रोश आणि विरोधकांनीही यावरुन सरकारला धारेवर धरलेल असतानाच आता ‘महावितरण’ने थकीत वीजबिल वसुलीचे आदेश जाहीर केले आहेत. राज्यात वीजबिल वसुलीची मोहीम राबवून थकबाकी वसुल करण्याचे व थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा त्वरित खंडीत करण्याचे आदेश ‘महावितरण’ने सर्व क्षेत्रिय कार्यालयास दिले आहेत. त्यामुळे, विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजपाने महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री ठाकरेंना लक्ष्य केले आहे.

लॉकडाऊन काळात वीज ग्राहकांनी बिलाच्या तक्रारी केल्यानंतर सरकारने वीज बिल भरण्यासाठी मुदतवाढ दिली होती. तसेच, कुणाचेही वीज कनेक्शन खंडीत न करण्याच्या सूचनही वीज वितरण कंपन्यांना दिल्या होत्या. विशेष म्हणजे वीज बिलात सवलत देण्याचे आश्वासनही सरकारने दिले होते. मात्र, ग्राहकांना काहीच सवलत मिळाली नाही, याउलट आता वीज कनेक्शन खंडीत करण्याचा इशारा सर्वसामान्य ग्राहकांना दिला आहे. त्यावरुन भाजपाने ठाकरे सरकारवर टीका केली आहे.