‘माझ्या बापानं रक्ताचं पाणी करून पक्ष उभारलाय, त्याला गालबोट लावाल तर गाठ माझ्याशी’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ‘माझ्या बापानं रक्ताचं पाणी करून पक्ष उभारलाय, त्याला गालबोट लावाल, तर गाठ माझ्याशी’, अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना ठणकावले आहे. दरम्यान, पैठण येथील माहेश्वरी भवनात राष्ट्रवादी काँग्रेसचे पैठण तालुका संपर्क गोर्डे यांनी कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन केले होते. या संवाद मेळाव्यात संजय वाघचौरे आणि माजी नगराध्यक्ष दत्ता गोर्डे यांच्या समर्थकांमध्ये बाचाबाची झाली. हा सगळा प्रकार खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमोरच झाल्याने सुप्रिया यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा समाचार घेतला.

आयोजित मेळाव्यादरम्यान विधानसभा सभा निवडणुकीत माजी आ. संजय वाघचौरे यांचे तिकीट कापल्यावरून त्यांच्या समर्थकांनी एकच गोंधळ घातला. त्यांनतर दत्ता गोर्डे यांच्या कार्यकर्त्यांनीही मेळाव्यात घोषणाबाजी केली. हा प्रकार वाढत जाऊन कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. कोणीच शांत होत नसल्याने संतापलेल्या खा. सुळे यांनी कार्यकर्त्यांना कडक भाषेत समज देत म्हंटले कि, ‘माझ्या बापाने रक्ताचे पाणी करून हा पक्ष वाढवला आहे. याचे भान कार्यकर्त्यांनी ठेवावे. पक्षाला गालबोट लावणाऱ्याला माफ करणार नाही. ही हुल्लडबाजी मी पहिल्यांदा पाहिली आहे. हे मी खपवून घेणार नाही. मी कुणाची लेक आहे, हे लक्षात घ्या.’ असे ठणकावत माझ्या बैठकीत पहिल्यांदा असा गोंधळ झाला असून, ही बैठक कायम कटू आठवणीत राहील, असा सनसनीत टोलाही सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्त्यांना लगावला.

दरम्यान, त्यानंतर बैठकीत हुल्लडबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना सुप्रिया सुळे मायेने, ममतेने समजावून सांगत होत्या. ‘आपण मोठे झालो आहोत, मॅच्युअर आहोत. हुल्लडबाजी आपल्याला शोभत नाही. नवीन कार्यकर्ता असा वागला तर समजू शकतो. पण इथे हुल्लडबाजी करणारे मॅच्युअर आहेत. सर्वांचे केस पांढरे झाले आहेत. मात्र, गोदरेजने ते रंगविल्याचे दिसते, ती गोदरेजची जवानी आहे, असे म्हणून यावेळी कार्यकर्त्यांत हास्यरंगही सुप्रिया सुळे यांनी भरला.