नियमांना ओवर रूल करण्याची माझी सवय : शरद पवार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन

सिंहसन हा चित्रपट काढण्याचे ठरले तेंव्हा जब्बार पटेल आणि अरुण साधू माझ्याकडे आले. मी तेव्हा मुख्यमंत्री होतो. हा चित्रपट ऑथेंटिक वाटावा म्हणून त्यांना मुख्यमंत्री कार्यलय आणि निवासस्थान येथे शूटिंग करायचे होते. याची चर्चा जेव्हा सुरू झाली. तेव्हा आमच्या जनरल एडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटने हे कसे अयोग्य आहे हे सांगण्यासाठी पानभर नोट पाठवली. पण नियमांना ओवर रूल करण्याची माझी सवय असल्याने मी त्याकडे लक्ष दिले नाही अशी आठवण माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार पुण्यात ‘झिपऱ्या’ चित्रपटाच्या खास शो वेळी सांगताच सभागृहात एकच हशा पिकला.

ज्येष्ठ साहित्यिक अरुण साधू यांच्या गाजलेल्या ‘झिपऱ्या’ कादंबरीवर आधारित अश्विनी रणजीत दरेकर प्रस्तुत झिपऱ्या मराठी चित्रपट माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये खास शो चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रतिभा पवार, राज्यसभा खासदार कुमार केतकर, जब्बार पटेल आणि मधुकर पिचड आदी उपस्थित होते.

यावेळी शरद पवार म्हणाले की, अरुण साधूंनी जे लिहिले ते मराठी व्यक्तीच्या अंतकरणामध्ये पोहचवण्याचे काम केले आहे. त्यांनी विशेषत: मुंबई नगरीवर लिखाण केले आहे. ज्या प्रकारे मुंबईचा उल्लेख त्यांनी केला. त्यानुसार मुंबईनगरीत देशाच्या कोणत्याही काना कोपऱ्यातून आलेल्यांना उपाशी ठेवत नाही हे त्यांच्या लिखाणातून दिसते.

ते पुढे म्हणाले की, त्यांचे साहित्य मराठी पुरते सीमित राहिले नाही. तर अन्य भाषेत देखील अनुवाद झाले आहेत. ही गोष्ट अभिमानास्पद असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.